Kolhapur, 22 July : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय आरोप प्रत्यारोपाचे खेळ आतापासूनच रंगू लागले आहेत. तत्पूर्वी ‘गोकुळ’मधील ठरावधारकांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी देण्यात आलेल्या टोकनच्या विषयाने कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारात एकच खळबळ उडाली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी टोकनचा संदर्भ घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कारभारावर थेट बोट ठेवले आहे. पण, केवळ टोकनच्या विषयानेच आतापासून ‘गोकुळ’च्या निवडणुकीला रंग चढू लागला आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक (Gokul Dudh Sangh) पुढील वर्षी होणार आहे. गेली 25 वर्षे महाडिक गटाच्या ताब्यात असलेला गोकुळ दूध संघ मागील निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील गटाने ताब्यात घेतला होता. जिल्ह्याचे आर्थिक आणि राजकीय केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर सर्वच राजकीय नेत्यांची नजर आहे. एक वेळ आमदारकी नको; पण ‘गोकुळ’चे संचालकपद द्या, अशी भूमिका घेऊनच अनेकजण निवडणुकीत उतरतात. तत्पूर्वी ज्या संचालकांकडे ठरावाची संख्या अधिक आहे. तेच गोकुळ दूध संघाच्या राजकारणात महत्त्वाचे मानले जातात.
त्या पार्श्वभूमीवर गोकुळचे सभासद असणाऱ्या ठरावधारकांना आपल्याकडे खेचण्यासाठी काही तालुक्यांमध्ये टोकन दिल्याची चर्चा आहे. निवडणुकीस एक वर्षाचा अवधी असला तरी एका सभासदाला पहिले टोकन 50, 000 दिल्याची चर्चा सध्या गोकुळच्या राजकारणात आहे. अशा जवळपास तब्बल ३ हजार ते ३ हजार ५०० ठराव धारकांना पहिले टोकन दिल्याची चर्चा कोल्हापूरच्या (Kolhapur) राजकारणात रंगली आहे. निवडणुकीपूर्वीच्या या खर्चाचा अंदाज घेतल्यास जवळपास ३० ते ३५ कोटींचा चुराडा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
गोकुळ दूध संघाची निवडणूक म्हणजे सध्या महाडिक गट आणि आमदार पाटील गटाच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. अशा परिस्थितीत मिळेल ती किंमत मोजून ही निवडणूक लढवावी आणि संघ ताब्यात घ्यावा, अशीच भूमिका दोन्ही गटाची आजपर्यंत राहिली आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ असो किंवा गोकुळ दूध संघाची निवडणूक पैशाचा वारेमाप खर्च हा संपूर्ण जिल्ह्याने पाहिलेला आहे. द्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ देखील सध्या गोकुळच्या राजकारणात सक्रिय आहेत.
ज्याच्याकडे जास्त ठराव आहेत, त्याच्याकडेच गोकुळ दूध संघाच्या सत्तेच्या चाव्या असणार, हे उघड गणित आहे, त्यामुळे ठरावधारकांना निवडणुकीच्या पहिले टोकन आणि प्रत्यक्ष निवडणुकीवर दुसरे टोकन देखील मिळण्याची चर्चा आहे. एका ठरावाची किंमत १ लाखापर्यंत जाण्याचा अंदाज बांधला जात आहे.
गोकुळ दूध संघाचे एकूण सभासद पाहिले, तर जवळपास सहा हजार सभासद आहेत. विजयापर्यंत पोहोचण्याच्या गणिताचा अंदाज बांधला तर जवळपास 60% सभासद एका विशिष्ट गटाकडे असावे लागणार आहेत, त्यामुळे सहाजिकच विजयाचे गणित धरून सभासदांना पहिले टोकन दिल्याची चर्चा आहे.
निवडणुकीला आणखी एक वर्षाचा अवधी असला तरी संपूर्ण कालावधीत निवडणूक यंत्रणेला लागणारा खर्च, प्रचारासाठी लागणारी वाहने, सभासदांवर केल्या जाणारा आर्थिक गोष्टींचा विचार केल्यास ‘गोकुळ’च्या आगामी निवडणुकीच्या खर्चाचा अंदाज घेतल्यास जवळपास १५० ते २०० कोटी रुपयांचा चुराडा होणार, हे निश्चित.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.