Kolhapur Local body Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : महायुतीतच रंगणार ‘बिग फाईट’; आजरा, चंदगडमध्ये आजी- माजी आमदार आमने-सामने

Kolhapur Local body Election Ajra Chandgad politics : आजरा आणि चंदगड नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुले झाल्याने महायुतीतमध्येच बिग फाईट होणार आहे.

Rahul Gadkar

आजरा आणि चंदगड नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण खुले झाल्याने महायुतीतमध्येच बिग फाईट होणार आहे. आमदार शिवाजी पाटील जातीनिशी लक्ष घालणार असून त्याच ताकदीने माजी आमदार राजेश पाटील आणि त्यांचा गट रिंगणात असणार आहे. राष्ट्रवादी व भाजपमध्येच इच्छुक अधिक आहेत. त्यामुळे उमेदवाराचा प्रभाव, जात समीकरणे ठरणार महत्त्‍वाची ठरणार आहेत. शिवाय दोन्ही राष्ट्रवादी विभक्‍त झाल्यानंतर कसे लढणार, याकडे लक्ष असणार आहे.

चंदगड नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्यामुळे इच्छुकांच्या आशेला पालवी फुटली आहे. केलेल्या कामांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जनतेसमोर जाणार आहे. त्याचवेळी आता या गटात अजित पवार गट व शरद पवार गट अशी शकले झाल्यामुळे या निवडणुकीत ते कसे लढतात? हे पाहावे लागणार आहे. मागील निवडणुकीच्या वेळी पाच नगरसेवक निवडून आलेल्या भाजपकडे यावेळी आमदारपद आहे.

त्यामुळे आमदार शिवाजी पाटील या निवडणुकीत कंबर कसून लक्ष घालणार आहेत. माजी आमदार राजेश पाटील यांनी एका कार्यक्रमात वरिष्‍ठांचा आदेश झाल्यास महायुती म्हणून निवडणुका लढवाव्या लागतील, असा सूचक इशारा दिला असला, तरी स्थानिक कार्यकर्त्यांना तो मानवणारा नाही. नगराध्यक्षपदासाठी सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजपमध्येच इच्छुकांची संख्या अधिक आहे. सुमारे आठ हजार मतदार 17 प्रभागांतून विभागले आहेत.

आजरा नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद खुले झाल्याने अनेकांच्या इच्छा आकांक्षांना धुमारे फुटले आहेत. आगामी नगरपंचायत निवडणूक चुरशीची होणार आहे. नगराध्यक्षपद खुले झाल्याने तिरंगी लढतीची शक्यता वाढली आहे. महाविकास पेक्षा महायुतीमध्येच बिग फाईट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयीच्या राजकारणानुसार आघाड्या करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नगराध्यक्षपदावर डोळा ठेवत अनेकांनी जोडण्या लावण्यास सुरुवात केली आहे. 2018 मध्ये नगरपंचायतीच्या झालेल्या पहिल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत स्थानिक आघाडीने नगराध्यक्षपदासह 9 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले होते. पाच वर्षे नगरपंचायतचा कारभार सत्ताधारी व विरोधकांनी हातात हात मिसळून केला. अडीच वर्षे नगरपंचायतीवर प्रशासक आहे. या काळात आजरा शहरातील रस्ते व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

हा प्रश्न आगामी निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार आहे. भाजप नेते अशोक चराटी, काँग्रेसचे युवा नेते अभिषेक शिंपी, शिवसेना ठाकरे गटाचे संभाजी पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विक्रमसिंह देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, अनिरुद्ध केसरकर, माजी उपनगराध्यक्ष आलम नाईकवाडे, नौशाद बुड्डेखान, अन्याय निवारणचे परशुराम बामणे, रशिद पठाण, अबुताहेर तकिलदार यांचा प्रमुख इच्छुकांत समावेश आहे. पुढील काळातील राजकीय हालचाली आणखी काही नावांचा समावेश होऊ शकतो. गणेशोत्सव व नवरात्रोत्सवात इच्छुकांनी मंडळांना देणगी स्वरूपात मदत करून उमेदवारीचे संकेत दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT