Sangli : सचिन निकम
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा धुरळा उडण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा परिषद गट आणि गणात आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून इच्छुकांच्यां गुडघ्याचे बाशिंग दिसत आहे. अशातच लेंगरे जिल्हा परिषद गट व गणात बाबर विरुद्ध पाटील गटात पारंपरिक लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहावयास मिळत आहे. (Traditional political rivalry between Babar and Patil groups expected in Lengare Zilla Parishad)
गत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बाबर गटाने प्राबल्य मिळविले. लेंगरे जिल्हा परिषद गट हा कायमच मतदारसंघातील चर्चेतील ठरला आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे खंदे कार्यकर्ते दिवंगत निवृत्ती बागल, जालिंदर पाटील यांनी बाबर यांना साथ देत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
मात्र अलीकडे लेंगरे गटातील राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी टेंभूचे आणलेले पाणी व केलेल्या विकासकामांमुळे गटात त्यांची पकड मजबूत आहे. अनिल बाबर यांचे पुत्र आमदार सुहास बाबर व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक अमोल बाबर यांनी चांगला संपर्क ठेवला आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे पुत्र माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने कार्यकर्ते ‘रिचार्ज’ झाले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांना पक्षाचे बळ मिळणार आहे. वैभव पाटील यांनीही लेंगरे गटात संपर्क वाढविला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होण्याआधीच राजकीय क्षेत्रात उलथापालथ झाल्याने नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नवीन राजकीय गणिते आखण्यास सुरुवात केली आहे.
गत लेंगरे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत बाबर गटाच्या नीलम सकटे विरुद्ध पाटील गटाच्या शोभा खिलारे यांच्यात लढत झाली होती. त्यात नीलम सकटे विजयी झाल्या होत्या, तर पंचायत समिती निवडणुकीत लेंगरे गणात बाबर गटाच्या मनीषा बागल विरुद्ध अपक्ष सारिका शिंदे अशी लढत झाली. त्यात मनीषा बागल विजयी झाल्या, तर करंजे गणात बाबर गटाच्या सारिका माने विरुद्ध पाटील गटाच्या सुरेखा माने यांच्यात लढत झाली. त्यात सारिका माने विजयी झाल्या. त्यामुळे लेंगरे व करंजे गणावर बाबर गटाचे वर्चस्व राहिले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी लेंगरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. बाबासाहेब मुळीक यांचे पुत्र ॲड. संदीप मुळीक, माजी सरपंच प्रशांत सावंत, प्रकाश बागल, हर्षवर्धन बागल, विनायक मोहिते, सुनील पाटील, राधिका बागल, मनीषा बागल, पूनम मुळीक इच्छुक आहेत. मात्र आरक्षण काय पडते, यावर सर्व राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
लेंगरे जिल्हा परिषद गटांतर्गत लेंगरे व करंजे हे दोन गण आहेत. लेंगरे गणात लेंगरे, देविखिंडी, मादळमुठी, भूड, रेवणगाव, जखीणवाडी, धोंडगेवाडी, घोटी खुर्द, ऐनवाडी, पोसेवाडी, गोरेवाडी, जाधववाडी. करंजे गणात करंजे, बलवडी (खा.), मेंगाणवाडी, बेणापूर, सुलतानगादे, रामनगर, शेडगेवाडी, भडकेवाडी, धोंडेवाडी, पळशी, बाणूरगड, ताडाचीवाडी, हिवरे, मोही या गावांचा समावेश आहे. जुना खानापूर जिल्हा परिषद गट होता. तेथे नगरपंचायत झाल्याने आता नव्याने करंजे गण व गट तयार होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे वरील गण व गटातील गावांत बदल होणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.