Mumbai News : आयएएस अधिकारी व्हावं की यशस्वी उद्योजक बनावं? करिअरच्या वळणावर उभ्या असलेल्या अनेक तरुणांच्या मनात हा प्रश्न असतो. मात्र, या प्रश्नाचं उत्तर शोधताना केवळ दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा स्वतःची क्षमता आणि आवड ओळखणं महत्त्वाचं आहे, असा स्पष्ट संदेश आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांना दिला. पिंपरी-चिंचवड येथे आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये एका तरुणाने त्यांना करिअरविषयी प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना मुंढे यांनी स्वतःच्या मुलांच्या करिअरबाबतही परखड भूमिका मांडली. त्याचबरोबर दुष्काळ, पाणी व्यवस्थापन आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेच्या संधींवरही त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले.
‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो’मध्ये एका तरुणाने तुकाराम मुंढे यांना आयएएस अधिकारी व्हावं की उद्योजक बनावं? आणि हाच प्रश्न तर त्यांच्या मुलांनी विचारला तर त्यावर त्यांचे उत्तर काय असेल असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी करिअर निवडताना इतरांचं अनुकरण करण्याऐवजी स्वतःची क्षमता ओळखण्याचा सल्ला दिला.
तसेच समाजाचा आपण एक भाग आहोत आणि समाजासाठी मूल्यवर्धन करणं महत्त्वाचं आहे, असं सांगत मुंढे म्हणाले की, एखाद्याने आयएएस व्हावं की उद्योजक, हा निर्णय त्याच्या स्वतःच्या आवडीनिवडी आणि कौशल्यांवर आधारित असायला हवा. केवळ प्रतिष्ठा, सामाजिक दबाव किंवा इतरांना मिळालेलं यश पाहून करिअर निवडणं योग्य नाही.
एखाद्या क्षेत्रात काम करण्यापूर्वी आपल्याला नेमकं काय जमतं, कोणत्या गोष्टीत रस आहे आणि समाजातील कोणती समस्या आपण सोडवू शकतो, याचा विचार करणं गरजेचं आहे. स्वतःची क्षमता आणि समस्येची योग्य ओळख करून त्यावर काम केल्यास यशाचा मार्ग सापडू शकतो, असा संदेश त्यांनी दिला.
दुष्काळ आणि ग्रामीण भागातील समस्यांवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचं आवाहन केलं. दुष्काळाकडे केवळ संकट म्हणून न पाहता, त्यामागची कारणं शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तर दुष्काळ नेमका का निर्माण होतो आणि पुढील सहा ते सात महिन्यांत त्यावर कोणते उपाय करता येतील, याचा गांभीर्याने विचार झाला पाहिजे. प्रत्येक वेळी संकट आल्यानंतर मदतीची वाट पाहण्याऐवजी मूळ समस्येवर उपाय शोधण्याची मानसिकता विकसित होणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. तर ग्रामीण भागात दुग्धव्यवसायासारख्या क्षेत्रांमध्ये रोजगार आणि उद्योजकतेच्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अन्न व औषध प्रशासन (FDA) क्षेत्रातील आपल्या कामाचा संदर्भ देत तुकाराम मुंढे यांनी दूध उत्पादन आणि दुग्धव्यवसायातील संधींवर भाष्य केलं. दूध हे अन्नसाखळीतील महत्त्वाचं उत्पादन असल्याने त्याची गुणवत्ता राखणं आणि या क्षेत्रातील गैरप्रकार रोखणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. दुधाची मागणी, उत्पादनाची उपलब्धता आणि ग्राहकांना मिळणाऱ्या दर्जेदार दुधाचा विचार करता दुग्धव्यवसायात उद्योजकतेसाठी मोठा वाव आहे.
ग्रामीण भागातील तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उपलब्ध संसाधनांचा अभ्यास करून व्यवसायाच्या संधी शोधाव्यात. मात्र, दुग्धव्यवसाय करताना पाणी आणि पशुखाद्याची उपलब्धता यांसारख्या अडचणींचाही विचार करावा लागतो. त्यावर उपाय म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही त्यांनी सुचवले आहे.
पशुसंवर्धन विभागात काम करत असतानाचा अनुभव सांगताना मुंढे यांनी हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानाचं महत्त्व अधोरेखित केलं. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी जागेत आणि तुलनेने कमी पाण्यात पशुखाद्य तयार करण्याचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो. ग्रामीण भागात दुग्धव्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची चिंता सतावते.
मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाची योग्य माहिती आणि नियोजन असल्यास या अडचणींवर मात करता येऊ शकते. हायड्रोपॉनिक्स पद्धतीने हिरवा चारा तयार करून पशुखाद्य व्यवस्थापन अधिक परिणामकारक करता येऊ शकतं, असा मुद्दा त्यांनी मांडला. दुधाची गुणवत्ता राखणं, उत्पादन वाढवणं आणि दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया करणारे उद्योग उभारणं, या माध्यमांतून ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.
दुष्काळाच्या प्रश्नावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी शासनाच्या मदतीवर पूर्णपणे अवलंबून राहण्याच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केला. दुष्काळ पडला की टँकर, बोअरवेल आणि इतर मदतीची मागणी केली जाते. शासनाकडून मदतही दिली जाते. मात्र, दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होत असेल, तर मूळ समस्येचा शोध घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. एखाद्या गावात किती बोअरवेल खोदल्या गेल्या, त्यांचा किती काळ उपयोग झाला आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी नेमके कोणते उपाय केले गेले, याचा हिशोब ठेवला जातो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केवळ तात्पुरते उपाय करण्याऐवजी पाण्याचं नियोजन, भूजल पुनर्भरण आणि पावसाचं पाणी साठवण्यावर भर दिला पाहिजे. अन्यथा, दरवर्षी त्याच संकटाचा सामना करावा लागेल, हा त्यांच्या भाषणाचा महत्त्वाचा मुद्दा होता.
गावातील बदलांचा अनुभव सांगताना मुंढे यांनी काँक्रिटीकरण आणि पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांचा प्रश्न मांडला. पूर्वी गावांमध्ये विहिरी आणि इतर पारंपरिक जलस्रोतांमधून पाणी उपलब्ध होत असे. मात्र, कालांतराने बोअरवेल, पाइपलाइन आणि काँक्रिटच्या रस्त्यांचं प्रमाण वाढलं. अनेक ठिकाणी भूजलसाठे कमी होण्याची समस्याही निर्माण झाली आहे. पावसाचं पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेल्यास भूजल पुनर्भरणावर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे विकासकामं करताना पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि जमिनीत पाणी मुरण्याची प्रक्रिया लक्षात घेणं आवश्यक आहे, असं त्यांनी सांगितलं. तर जिथे गरज आहे तिथे काँक्रिटीकरण करावं; मात्र, त्यामुळे पावसाचं पाणी गावाबाहेर वाहून जाणार नाही आणि जमिनीत मुरण्याची प्रक्रिया कायम राहील, याची काळजी घेतली पाहिजे, असा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.