Solapur Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : सोलापूर डीसीसी बॅंकेच्या निवडणुकीत ट्विस्ट; माजी संचालक अर्ज भरून देवेंद्र फडणवीसांना भेटणार...

Solapur Leader Will Meet CM Devendra Fadnavis : सोलापूर जिल्हा बँकेचे माजी संचालक निवडणूक लढवणार आहेत. कलम 88 अंतर्गत कारवाईला स्थगिती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

प्रमोद बोडके

Solapur, 24 October : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत माजी संचालकही उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सहकार कायदा कलम ८८ अन्वये माजी संचालकांवर केलेल्या कारवाईला स्थगिती मिळावी, यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याचा निर्णय आज सोलापुरात झालेल्या बैठकीत झाला. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रमुख नेत्यांची हॉटेल बालाजी सरोवरमध्ये बैठक झाली.

या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राजेंद्र राऊत, आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दिपक साळुंखे, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे, दिग्विजय बागल उपस्थित होते.

दुपारी ४ वाजता सुरु झालेली बैठक तब्बल २ तास चालली. संचालक मंडळ निवडणुकीत सर्वांनी सोबत रहायचे, एकामेकांच्या विरोधात टिका टिपण्णी करायची नाही, असा एकमुखी निर्णयही या बैठकीत झाला असल्याचे समजते.

माजी संचालकांनी त्यांच्या घरातील युवा सदस्यांचे मतदार प्रतिनिधी ठराव करून घेतले आहेत. माजी संचालकांना निवडणूक लढण्यास तांत्रिकदृष्ट्या अडचण आलीच तर पर्याय म्हणून युवा नेत्यांना संधी दिली जाणार आहे.

जिल्हा बँकेसाठी सोमवारपासून (ता. २६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली जाणार आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी २ नोव्हेंबरला होणार आहे. माजी संचालकांना निवडणूक लढता येणार की लढता येणार नाही? याचा फैसला याच दिवशी होणार आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत हा दिवस महत्वाचा ठरणार आहे.

आठ जागांचे वाटप शेवटच्या टप्प्यात

जिल्हा बँकेत १९ संचालक निवडले जाणार आहेत. त्यातील ११ जागा या प्रत्येक तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतून असणार आहेत. या जागांचे वाटप व उमेदवारी जवळपास निश्‍चित आहे. दोन महिला, एक ओबीसी, एक भटक्या जाती/जमाती व एक एससी/एसटी, दुग्धमधील एक, पणनमधील एक व नागरी बँकांमधील एक अशा आठ जागांचे वाटप उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी होण्याची शक्यता आहे. जिल्हा बँकेत कोणाची सत्ता व चेअरमन कोण होणार? याचे गणित सोडविण्यासाठी या आठ जागांचे वाटप महत्वाचे असल्याने या वाटपाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT