

Satara, 24 October : सातारा जिल्हा परिषदेच्या २१ जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरीत १२ जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात आहेत. यातील काहींनी माघार घेत राजकीय पक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या १२ ठिकाणी मातब्बरांमध्ये तुल्यबळ लढती होत आहेत. सात ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये, तर तीन ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये लढत आहे. यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराज देसाई, शेखर गोरे, ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर, सत्यजित पाटणकर, मनोज पोळ यांचा समावेश आहे. यातील जयकुमार गोरे विरुद्ध शेखर गोरे, शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजित पाटणकर अशा लक्षवेधी लढतींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष असणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेत राबवलेले ऑपरेशन कमळ जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीत राबवून भाजप नेत्यांनी बॅंक ताब्यात घेण्याचे मनसुबे आखले आहेत. त्याचे पहिले पाऊल भाजपने बिनविरोधमध्ये टाकले आहे. बिनविरोध झालेल्या नऊ संचालकांमध्ये भाजपचे सहा, राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेच्या एका संचालकाचा समावेश आहे. आता उर्वरीत १२ जागांपैकी किमान पाच जागा जिंकण्यांचे भाजपचे उद्दिष्ट असणार आहे.
भाजप नेत्यांनी जिल्हा सहकारी बॅंक ताब्यात घेण्याच्या दृष्टीने पहिल्यापासून वाटचाल केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री गोरे यांनी प्रत्येक मतदारसंघात भाजपचा उमेदवार देण्याचा हेतू साधला आहे, त्यामुळे जिल्हा बॅंकेत महायुतीतच वर्चस्ववाद दिसून येत आहे.
यावेळेस निवडणूक लागलेल्या १२ जागांपैकी सात जागांवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांत लढत आहे. यामध्ये जावळी, कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, औद्योगिक-विणकर व मजूर संस्था, इतर मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती विमुक्त जमाती प्रवर्गाचा समावेश आहे. भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांत महाबळेश्वर, माण, फलटण या तीन ठिकाणी लढत पाहायला मिळत आहे.
सर्वात अटीतटीची व प्रतिष्ठेची लढत ही माण, पाटण, कऱ्हाड, महाबळेश्वर, जावळी, फलटण या सोसायटी मतदारसंघांत आहे. माणमध्ये खुद्द ग्रामविकास मंत्री गोरे, तर पाटणमधून पालकमंत्री देसाई हे रिंगणात आहेत. या नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असेल. त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून आपल्या बाजूचे ठराव करण्यावर भर दिला आहे.
माणमध्ये ग्रामविकास मंत्री गोरे यांच्या विरोधात त्यांचे बंधू विद्यमान संचालक व शिवसेनेचे नेते शेखर गोरे आणि राष्ट्रवादीचे नेते मनोजकुमार पोळ हे रिंगणात आहेत. येथे महायुतीतील तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात असल्याने ही लढत तिघांसाठीही प्रतिष्ठेची ठरणार आहे. ग्रामविकास मंत्री गोरेंना ही निवडणूक जिंकणे महत्त्वपूर्ण असेल.
पाटणला पालकमंत्री देसाईंच्या विरोधात पारंपरिक विरोधक सत्यजित पाटणकर हे असून, दोघांनीही आपले मतदार सुरक्षितस्थळी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्री गोरे आणि देसाई या दोन्ही नेत्यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल. कऱ्हाडला राष्ट्रवादीचे उदयसिंह पाटील आणि धनंजय पाटील यांच्यात चुरशीची लढत आहे. कोरेगावात सुनील माने व सुनील खत्री हे दोन मित्रच एकमेकांविरोधात लढत आहेत. आता यावेळेस कोण कोणाला शह देणार याची उत्सुकता आहे.
खंडाळ्यात राष्ट्रवादीचे अजय भोसले व भाजपचे संजीव गाढवे यांच्यात अटीतटीची लढत असून, येथे मंत्री मकरंद पाटील हे अजय भोसलेंच्या पाठीशी ताकद लावणार आहेत; पण शामराव गाढवे हेही रिंगणात असल्याने येथे ५० मतांच्या खेळात कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
महाबळेश्वरात विद्यमान संचालक राजेंद्र राजपुरे अपात्र ठरल्याने त्यांची पत्नी रूपाली राजपुरे रिंगणात असून, त्यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेचे संजय मोरे उभे आहेत. येथील लढतीत मंत्री मकरंद पाटील व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांची सत्त्वपरीक्षा असणार आहे.
जावळीत यावेळी विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे विठ्ठल गोळे हे लढत देत असून, जावळीकर माजी आमदार शशिकांत शिंदेंच्या शिलेदाराला साथ देणार की रांजणेंची बाजू घेणार याची उत्सुकता आहे.
वाघांचे काळेंना आव्हान
औद्योगिक विणकर आणि मजूर संस्था मतदारसंघातून, तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून सुनील वाघ यांचे दोन अर्ज होते. त्यामुळे मजूरमधून त्यांच्या अर्जामुळे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी चंद्रकांत जाधव यांना बिनविरोध होता आले नव्हते. आज त्यांनी चंद्रकांत जाधव यांना पाठिंबा दिला आहे; पण विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून त्यांनी अर्जुन काळे यांच्यापुढील आव्हान कायम ठेवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.