Sachin kalyanshetti-Devendra Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News : सोलापुरातील भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र बैठकीला दोन आमदारांची दांडी...

Western Maharashtra Meeting : भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीला सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, सोलापूरचे दोन आमदार अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेला उधाण आले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 20 August : भारतीय जनता पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठक आज सोलापूरमध्ये झाली. बैठकीला सोलापूर, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, सोलापूरचे दोन आमदार पक्षाच्या या महत्वपूर्ण बैठकीला अनुपस्थित होते, त्याची कार्यक्रमस्थळी दिवसभर चर्चा रंगली होती.

सोलापुरातील पश्चिम महाराष्ट्र बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, काही कारणांमुळे फडणवीस येऊ शकले नाहीत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या हे उपस्थित होते.

सोलापुरात पश्चिम महाराष्ट्राची विभागीय बैठक असूनही जिल्ह्यातील दोन आमदारांनी बैठकीला दांडी मारल्याचे दिसून आले. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे हे दोघे पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित होते. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या ‘गुडबुक’मधील मानले जातात.

अनुपस्थितीचे कारण...

बैठकीच्या अनुपस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे या दोघांशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. दरम्यान, कल्याणशेट्टी यांची तब्येत बरी नसल्याने ते येऊ शकले नाही, तर आमदार कोठे हे कुटुंबीयांसह पूर्वनियोजित परदेश दौऱ्यावर असल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत, असे भाजप पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

देशमुखांची पूर्णवेळ हजेरी

दरम्यान, मागील सुमारे दोन वर्षांपासून पक्षाच्या सावर्जनिक कार्यक्रमापासून दूर असलेले ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख मात्र आवर्जून उपस्थित होते. हे दोन्ही नेते पूर्णवेळ बैठकीला हजर होते, त्याचीही कुजबूज कार्यक्रमस्थळी होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT