Udayanraje and Ramraje
Udayanraje and Ramraje  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : 'उदयनराजे चिडलेले असतात तेव्हा मला काहीही वाटत नाही, मात्र..' ; रामराजेंचं वक्तव्य!

उमेश भांबरे :सरकारनामा

Satara news : 'उदयनमहाराज चिडलेले असतात, त्यावेळी मला काहीही वाटत नाही. पण, महाराज गालातल्या गालात हसले की, माझ्या पोटात गोळा येतो.', असं मिश्किल विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलं आहे. तर छत्रपतींच्या घराण्याच्या नावलौकिकासाठी तुम्ही दोघा भावांनी एकत्र एकदिलाने राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

खासदार उदयनराजे(Udayanraje Bhosale) व माजी सभापती रामराजे यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांनी दोघे एकमेकांना बोट दाखवण्यात कमी पडत नाहीत. आज मात्र, उदयनराजेंनी फलटणकरांना सुखद धक्का दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने खासदार उदयनराजे भोसले हे कराडचा दौरा संपवून फलटणच्या जाहीर सभेला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते व माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या लक्ष्मीविलास पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत भाजपचे लोकसभा संघटक सुनील काटकर उपस्थित होते. खासदार उदयनराजे आल्याचे पाहून फलटणकरांच्या भुवया उंचावल्या होत्या. कार्यकर्त्यांनीही वाड्याबाहेर गर्दी केली होती.

यावेळी रामराजे(Ramraje Naik Nimbalkar) यांनी उदयनराजेंचे पुष्पगुच्छ देत तसेच एकमेकांना मिठी मारुन स्वागत केले. या भेटीत शेजारी बसूनही दोघांनीही एकमेकांना चिमटे काढण्याचे सोडले नाही. सध्याच्या राजकिय परिस्थितीवर तासभर गप्पा रंगल्या. त्यानंतर रामराजेंनी उदयनराजेंना वडीलकीचा सल्लाही दिला.

यावेळी रामराजे म्हणाले, महाराज चिडलेले असतात त्यावेळी मला काहीही वाटत नाही. पण महाराज गालातल्या गालात हसले की, मात्र, माझ्या पोटात गोळा येतो. आगामी निवडणुकीत राजे आम्ही तुमच्या बरोबरच आहोत, काळजी करु नका, असेही त्यांनी सांगितले. शिवेंद्रसिंहराजे व तुम्ही एकत्र एक दिलाने राहिले पाहिजे. राजघराणे म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे. वडीलकीच्या नात्यातून तुम्हाला आमचे सांगणे आहे, तसेच त्यांनाही हे मी सांगणार आहे. त्यावर उदयनराजे, मुळात आपल्यात वाद आहेच कुठे असे म्हणत हासले. यानंतर दोघांत सध्याच्या घडामोडीवर चर्चा झाली आणि उदयनराजे सातारकडे रवाना झाले.

(Edited by -Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT