MP Udayaraje Bhosale, Ashwini Vaishnav sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale News : उदयनराजेंनी रेल्वेमंत्र्यांपुढे वाचला समस्यांचा पाढा; प्रवाशांसह, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

Umesh Bambare-Patil

Udayanraje Bhosale News : रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात खासदार उदयनराजे भोसले यांनी रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांचा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला आणि त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने तातडीने पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी दिल्या.

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी जिल्ह्यातील सातारा, लोणंद, कराड येथील रेल्वे स्थानकांबाबतच्या समस्यांसंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव Ashwini Vaishnav यांच्याशी चर्चा केली. लोणंद हे भविष्यात ते जंक्शन होण्याची गरज आहे. या स्थानकाचा फायदा साताऱ्यासह पुणे, सोलापूर जिल्ह्यातील प्रवाशांनाही होतो.

दर्शन एक्सप्रेस, कोल्हापूर-अहमदाबाद एक्सप्रेस, पूर्णा एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, महालक्ष्मी एक्सप्रेस आणि दादर-हुबळी एक्सप्रेस या प्रमुख गाड्यांना लोणंदला थांबा द्यावा. फलाट क्रमांक एकची लांबी वाढवावी. तसेच स्थानकपरिसराचे सुशोभीकरण करावे, या मागण्या लोणंद प्रवासी संघटनेने उदयनराजेंकडे केल्या होत्या. याविषयीही सकारात्मक चर्चा होऊन मंत्री वैष्णव यांनी कार्यवाहीच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.

रेल्वेमार्ग दुपदरीकरणामुळे पार्ले (ता. कऱ्हाड) हद्दीतील शेतीकडे आणि लोकवस्त्यांकडे जाणारे मार्ग बंद झाले आहेत, त्यामुळे प्रचंड गैरसोय होत असल्याबाबत सरपंच आणि ग्रामस्थांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली होती. ही समस्या अग्रक्रमाने सोडविण्याची विनंती उदयनराजेंनी श्री. वैष्णव यांना केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या ठिकाणी अंडरपास काढून रस्ते तयार केल्यास केवळ पार्लेच नव्हे तर वडोली निळेश्वर, रिसवड आणि लगतच्या अनेक गावांना लाभ होणार आहे, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत तातडीने तांत्रिक पाहणी करण्याच्या सूचना श्री. वैष्णव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

‘अजिंक्यतारा एक्सप्रेस’ची मागणी

सातारा सैनिकांचा जिल्हा असल्याने सुटीसाठी येणाऱ्या जवानांच्या सोयीसाठी यशवंतपूर संपर्क क्रांती एक्सप्रेस आणि कर्नाटक क्रांती एक्सप्रेस या गाड्यांना साताऱ्यात थांबा द्यावा. मुंबई ते पंढरपूर गाडी सातारा, कऱ्हाड, सांगली, मिरजमार्गे सुरू करून तिला ‘अजिंक्यतारा एक्सप्रेस’ नाव द्यावे. झेलम, दुरांतोसारख्या गाड्या पुण्याऐवजी मिरज, कोल्हापूरपर्यंत सुरू कराव्यात. साताऱ्यात पिट लाइन, गाड्यांच्या देखभालीची तसेच रेल्वेत पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करावी, आदी मागण्या त्यांनी केल्या.

कराड-चिपळूणचा डीपीआर तयार...

कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाद्वारे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेसाठी हा प्रकल्प हाती घेण्याची विनंती उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांना केली. या रेल्वेमार्गाचा नवा डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेतले असून तवकरच ते पूर्ण करू, असे आश्वासन त्यांनी दिले. सातारा पोस्ट कार्यालयाच्या डागडुजी, दुरुस्तीसाठी केलेल्या निधीच्या मागणीस मंजुरी दिल्याबद्दल उदयनराजे यांनी श्री. वैष्णव यांचे आभार मानले. तसेच या कामांसाठी जास्तीत जास्त निधी देण्याची मागणी केली.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT