Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale Pramod Ingale
पश्चिम महाराष्ट्र

उदयनराजेंना साताराच्या नेत्यांनी खेळविले... पण त्यांनीही शिवेंद्रराजेंना `गाठलेच!`

सरकारनामा ब्युरो

सातारा : जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँकेच्‍या निवडणुकीसाठीचा अर्ज माघारी घेण्‍याच्‍या दिवशी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्‍यासह आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. बिनविरोध निवडी जाहीर झाल्‍यानंतर उदयनराजेंनी जाहीर केल्‍यानुसार आज शिवेंद्रसिंहराजेंची सुरुची येथे भेट घेत त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. शुभेच्‍छा दिल्‍यानंतर झालेल्‍या औपचारिक चर्चेदरम्‍यान, शिवेंद्रसिंहराजेंनी शेवटी काय तुम्‍हाला जे करायचे होते ते केलेच, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंना उद्देशून केले. याचा प्रतिवाद करताना दहा ठिकाणी निवडणूक लागलीय, आमची झाली ना-बास झाल, असे वक्‍तव्‍य करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.

जिल्‍हा बँकेच्‍या संचालक मंडळात खासदार उदयनराजे भोसले यांच्‍यासमावेशाला राष्‍ट्रवादीसह शिवेंद्रसिंहराजेंचा विरोध होता. याबाबत वरिष्‍ठस्‍तरावरील प्रत्‍येक बैठकीत कधी तो निर्णय शिवेंद्रसिंहराजेंवर सोपवा तर कधी शिवेंद्रसिंहराजे तो निर्णय खासदार शरद पवार, उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांच्‍याकडे सोपवा, अशी मागणी होत होती. नावावर एकमताची मोहोर उठत नसल्‍याने उदयनराजेंनी काहीही झाल तरी मी आहेच, असे वक्‍तव्‍य करत रान तापविण्‍यास सुरुवात केली होती.

जिल्‍ह्‍यातील ज्‍येष्‍ठांच्‍या गाठीभेटी घेत उदयनराजेंनी निवडणूकीचे वातावरण तापवले होते. याचदरम्‍यान त्‍यांनी शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेणार असल्‍याचे सांगत ते न भेटल्‍यास त्‍यांना गाठणारच, असे वक्‍तव्‍य केले होते. उदयनराजेंच्‍या या वक्‍तव्‍यामुळे अर्ज माघारीच्‍या वेळी होणाऱ्या हायव्‍होल्‍टेज ड्राम्‍याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अपेक्षेप्रमाणे उदयनराजेंच्‍या विरोधातील उमेदवारांनी अर्ज मागे घेत त्‍यांच्‍या बिनविरोध विजयावर शिक्कामोर्तब उमटवले. यानंतर शिवेंद्रसिंहराजे देखील बिनविरोध निवडून आले.

अर्ज माघारीचे सोपस्‍कार पार पडल्‍यानंतर दुपारी उदयनराजे हे शिवेंद्रसिंहराजेंच्‍या सुरुची निवासस्‍थानी गेले. पुष्‍पगुच्‍छ, भेटवस्‍तु देत उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा सत्‍कार केला. यानंतर त्‍यांनी निवडणूकीबाबत शिवेंद्रसिंहराजेंशी चर्चा केली. चर्चेदरम्‍यान ११ जागा बिनविरोध झाल्‍या तर १० जागी निवडणूक लागल्‍याचे शिवेंद्रसिंहराजेंनी त्‍यांना सांगितले. हे सांगतानाच त्‍यांनी तुम्‍हाला काय पाहिजे ते, करायचे ते केलेच ना, असे वक्‍तव्‍य केले. यानंतर आमची झाली ना बास झाल ना, असे वक्‍तव्‍य उदयनराजेंनी करत उपस्‍थितांमध्‍ये हास्‍य फुलवले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT