कराड : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजप आमदार मनोज घोरपडे यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असलेल्या उदयसिंह पाटील उंडाळकर यांनीही बाळासाहेब पाटील यांना धक्का दिला आहे. सह्याद्रीमध्ये आपण लक्ष देणार नाही. कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने काम करतील अशी भूमिका उंडाळकर यांनी घेतली आहे.
कराड आणि पाटण तालुक्यात मोठी राजकीय ताकद बाळगून असलेले उदयसिंह उंडाळकर यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला आहे. त्यांच्या या निर्णयाने दोन्ही तालुक्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. त्यातच त्यांनी आपल्या पक्षांतराचा पहिला धक्का महाविकास आघाडीचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांना दिला आहे. मनोज घोरपडे यांनी नुकतीच कोयना बँकेला भेट दिली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उंडाळकर बोलत होते.
सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत रयतचे कार्यकर्ते विद्यमान संचालक मंडळाच्या विरोधात काम करत आहे. याबाबत उंडाळकर म्हणाले, बाजार समिती निवडणुकीवेळी परिस्थिती वेगळी होती. परंतु सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सभासद नसताना निवडणुकीत लक्ष देणे उचित नाही. पण प्रत्येक ठिकाणी नेत्याने आदेश द्यावा, अशी परिस्थिती नसते. हा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी, सभासदांचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवर काही गोष्टी सोडवल्या पाहिजेत.
फक्त जो काही निर्णय घ्यायचा, तो एकत्रित घ्यावा यासाठी मला विचारण्याची गरज नाही. टोकाचा विरोध होण्यामागेही त्यांना काहीतरी त्रास झाला असेल, त्यानुसार ते निर्णय घेतील. पण ज्याच्या पोटात दुखेल, तो रडणारच, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका योग्य असल्याचा संदेश दिला. त्यामुळे उंडाळकर यांनी पक्षप्रवेशापूर्वीच महायुतीला पूरक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आता सह्याद्रीत सत्तांतराचा भूकंप होणार का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.