Satara Congress : पृथ्वीराजबाबा पडले, उंडाळकर निघाले... साताऱ्यातील काँग्रेस टप्प्याटप्प्याने कशी संपली?

Satara Congress : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अलिकडे पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या माध्यमातून इथल्या काँग्रेसचा सुवर्णकाळ जिल्ह्याने पाहिला.
Satara Congress
Satara CongressSarkarnama
Published on
Updated on

Satara Congress : सातारा जिल्हा म्हणजे कधीकाळचा काँग्रेसचा अभेद्य गड होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते अलिकडे पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांच्या माध्यमातून इथल्या काँग्रेसचा सुवर्णकाळ जिल्ह्याने पाहिला. पण 1999 मध्ये काँग्रेस फुटली तेव्हापासून जिल्ह्यात पक्षाला लागलेली घरघर आता अखेरच्या घटका मोजत आहे.

1999 नंतर जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा केवळ कराड दक्षिण मतदारसंघातच दिसला. अपवाद 2014 सालचा माण-खटावमधील जयकुमार गोरे यांचा काँग्रेसच्या तिकीटावर झालेला विजय. पण 2019 च्या निवडणुकीपूर्वी गोरे भाजपमध्ये गेले. तर 2024 च्या निवडणुकीत कराड दक्षिणेत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला. पण हा धक्का पचवेपर्यंत काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह उंडाळकर हेही काँग्रेसला राम राम करण्याच्या तयारीत आहेत. ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात काँग्रेसला एकही मोठा चेहरा उरणार नाही. पक्षाकडे आता जिल्हाभर प्रभाव असलेले नेतृत्व नाही. त्यामुळे काँग्रेसपुढे जिवंत राहण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहूया, जिल्ह्यातील काँग्रेस टप्प्या टप्प्याने कशी संपत गेली?

1996 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ्य नेते प्रतापराव भोसले यांचा शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पराभव केला. त्यावेळी अपक्ष उमेदवार असलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एक लाख 13 हजार मते घेतली. इथेच काँग्रेसला पराभवाचा मोठा धक्का बसला. या पराभवासह जिल्ह्यात शिवसेनेचाही प्रवेश झाला.

पण 1998 च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसच्या अभयसिंहराजे भोसले यांनी हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचा पराभव केला. त्यानंतर वर्षभरातच काँग्रेस पक्ष फुटला. शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी स्वतंत्र झाली. कराड दक्षिणचे काँग्रेस नेते विलासराव उंडाळकर वगळता जिल्ह्यातील विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक निंबाळकर, पी. डी. पाटील, लक्ष्मण पाटील असे जवळपास सर्वच नेते शरद पवारांबरोबर गेले.

Satara Congress
Congress Political Crisis : काँग्रेसला साताऱ्यात मोठा धक्का! उंडाळकर अजित पवार राष्ट्रवादीच्या वाटेवर?

त्याच वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना झाला. यात साताऱ्यात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव खर्डेकर आणि शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा पराभव करत राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव पाटील विजयी झाले. तर कराड मतदारसंघात काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव करून राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील खासदार झाले.

विधानसभा निवडणुकीतही जिल्ह्यातील केवळ कराड दक्षिणचा गड काँग्रेसने राखला. हा अपवाद वगळता बहुतांश जागांवर राष्ट्रवादीचाच विजय झाला. नंतर राष्ट्रवादीने काँग्रेससोबत आघाडी केली आणि इथेच जिल्ह्यातील काँग्रेस संपण्याची बीजे रोवली गेली. पुढील निवडणुकांमध्ये विद्यमान खासदार आणि आमदार असणाऱ्या पक्षांनाच जागा देण्यात आल्याने काँग्रेसचे चिन्हच जिल्ह्यातून गायब झाले.

त्यानंतर 2004 आणि 2009 पर्यंत लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहिले. लक्ष्मण पाटील, उदयनराजे भोसले साताऱ्यातून तर श्रीनिवास पाटील कराडमधून निवडून येत राहिले. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघातही राष्ट्रवादीचाच गजर वाजत होता. 2009 च्या पुनर्रचनेत कराड मतदारसंघ गायब झाला. पण 2014 आणि 2019 या लोकसभेच्या दोन्ही निवडणुकीत साताऱ्यातून राष्ट्रवादी विजय मिळवत राहिली.

2004, 2009, 2014 आणि 2019 अशी चारही टर्म लोकसभेची निवडणूक असो असो की विधानसभेची, सातारा जिल्ह्यातील काँग्रेसजनांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला. काँग्रेसनेही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्याचे काम इमाने इतबारे करून दाखवले. जिल्ह्यात सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा गजर होत राहिला तरीही कराड दक्षिणेत काँग्रेसचा पंजा कायम दिसत होता.

Satara Congress
Satara Politic's : अजितदादांच्या खेळीने ‘पृथ्वीराजबाबां’ची पुरती नाकाबंदी; साताऱ्यातील काँग्रेसचा अखेरचा गडही कोसळणार!

कराड दक्षिण राहिला होता काँग्रेसचा बालेकिल्ला :

2009 मध्ये लोकसभेचा एकसंघ सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले राष्ट्रवादीचे उमेदवार होते. कराडमध्ये विलासकाका उंडाळकरांनी राजेंच्या प्रचाराची जंगी सभा घेतली होती. त्यात उंडाळकरांच्या समर्थकांनी 'झेंडा कुणाचाही असला तरी, दांडा आमचाच आहे' असे सांगत काँग्रेसचे निवडणुकीतील महत्व अधोरेखित केले. आमची ताकदही निर्णायक आहे, हेच सूचित केले होते.

कराड दक्षिण हा स्वातंत्र्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता. आधी दिवंगत यशवंतराव मोहिते यांनी 25 वर्षे आणि त्यानंतर माजी मंत्री विलास काका उंडाळकर यांनी सलग 354 वर्षे कराड दक्षिण दक्षिणेतून प्रतिनिधीत्व केले. 2014 आणि 2019 असे दहा वर्षे पृथ्वीराज चव्हाण आमदार होते. पण यंदा भाजपच्या अतुल भोसले यांनी चव्हाण यांचा दणदणीत पराभव केला. त्यांनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलवले.

चव्हाण - उंडाळकर वाद :

पृथ्वीराज चव्हाण राज्याच्या राजकारणात आल्यानंतर उंडाळकरांशी त्यांचे फारसे जमले नव्हते. नेमके त्याच दरम्यान, पैलवान संजय पाटील खून प्रकरणात उदसिंह उंडाळकर यांचे नाव पुढे आले, ते तुरूंगात गेले. ते बाहेर आल्यानंतर चव्हाण आणि उंडाळकर यांच्यात अनेक वर्षे विस्तवही जात नव्हता. पण कालांतराने विलासकाकांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी जमवून घेतले.

पण नुकताच पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचा गड ढासळला. चव्हाण यांच्यावरील वयाच्या मर्यादा बघता उदयसिंह यांच्याच खांद्यावर काँग्रेसची धुरा होती. त्यामुळे ते तरी लढतील, काँग्रेसला तारतील त्यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा मिळवू असे कार्यकर्त्यांना वाटत होते. पण त्यांनीही काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस मृत्यूशय्येवर आहे हे सांगायला कोणा राजकीय पंडिताची गरज नक्कीच नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com