Kolhapur News : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या निवडणुकीनंतर आता अध्यक्षपदावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी महायुती सरकारने पाच शासननियुक्त सदस्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी चार सदस्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आमदार सतेज पाटील यांनीही या निर्णयाविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. त्यामुळे गोकुळमधील सत्तासंघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. अशातच सतेज पाटील यांना आता उद्धव ठाकरे यांचेही पाठबळ मिळाले आहे. या लढाईत शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून कोरमचा मुद्दा चर्चेत असतानाच महायुती सरकारने निवडणुकीनंतर नियमांमध्ये बदल करून पाच शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, यापैकी चार संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीचे संख्याबळ १२ वरून थेट १६ वर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या सतेज पाटील यांच्या गटासमोर नवे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सतेज पाटील आक्रमक झाले असून, राज्यातील विरोधी पक्षही या मुद्द्यावर एकवटताना दिसत आहेत. काँग्रेसने या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली आहे. तसेच सतेज पाटील यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत सतेज पाटील यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शवला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपवर निशाणा साधला आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीनंतर नियम बदलून चार संचालकांची नियुक्ती करत संख्याबळ १२ वरून १६ करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. हा दूध उत्पादकांच्या मतांचा अपहार असून, जनादेशात भेसळ करण्याचा प्रकार असल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.
राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळे गोकुळमधील सत्तासंघर्षाला राष्ट्रीय स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे सतेज पाटील यांच्या लढ्याला आणखी बळ मिळाले आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे यांनीही सतेज पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधत या लढ्याला पाठिंबा जाहीर केला आहे.
मुंबईत सतेज पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना फोन केला. यावेळी गोकुळच्या प्रश्नावर सुरू असलेल्या लढ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सतेज पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यामुळे गोकुळच्या सत्तासंघर्षात आता काँग्रेसला शिवसेनेचीही साथ मिळाली असून, आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.