Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satej Patil : सतेज पाटील यांच्या लाल दिव्याचा निर्णय उद्धव ठाकरेंच्या हाती; विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी हालचालींना वेग

Leader of Opposition in Legislative Council : अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात म्हणजे २९ ऑगस्ट रोजी संपत आहे. शिवसेनेचे परिषदेतील संख्याबळ कमी होत आहे, त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितल्याची चर्चा आहे.

Rahul Gadkar

Kolhapur, 24 July : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीची मुदत पुढील महिन्यात संपणार आहे, त्यामुळे दानवेंच्या रिक्त होणाऱ्या जागेवर महाविकास आघाडीतील कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू आहे. विधासभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव विरोधी पक्षनेते करण्याच्या हालचाली सुरू आहेत, त्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. पण, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावरच पुढील निर्णय अवलंबून आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात म्हणजे २९ ऑगस्ट रोजी संपत आहे. नुकत्याच झालेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनात त्यांचा निरोप सभारंभ पार पडला. शिवसेनेचे परिषदेतील संख्याबळ कमी होत आहे, त्यामुळे काँग्रेसने जास्त संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितल्याची चर्चा आहे.

सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सात सदस्य आहेत. अंबादास दानवे निवृत्त झाल्यानंतर त्यांची संख्या सहा होईल. त्यामुळे काँग्रेसने (Congress) विधान परिषदेत विरोधी पक्षनेता मिळविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काही अपक्षांचा पाठिंबा काँग्रेसने मिळविल्याची चर्चा सुरू आहे. त्या जोरावर काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

काँग्रेसकडून एक युवा चेहरा देण्याच्या हालचाली सुरू आहेत. आक्रमक शैली आणि आर्थिक क्षमता असणारा चेहरा म्हणून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे पाहिले जाते. सध्या सतेज पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नावाला दिल्लीतून हिरवा कंदील मिळाल्याचेही समजते.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला असला तरी ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांच्या नियुक्ती करण्याचे पत्र नार्वेकर यांना देण्यात आले आहे, त्याला काँग्रेस पक्षानेही पाठिंबा दिलेला आहे. विधान परिषदेत काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा केला आहे, त्याला ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची आवश्यकता आहे.

विधानसभेत काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून काँग्रेसला पाठिंबा मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसकडून देखील दावा करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT