Solapur, 10 November : भाजपची नीती ही वापरा आणि फेकून द्या, अशी आहे. तुमचा उपयोग संपला की, तुम्हाला फेकून दिलं जातं. हे सहकार क्षेत्र अमित शाह कशावरून गिळणार नाहीत? राज्यातील सहकारी बॅंका अदानींच्या घशात कशावरून घालणार नाहीत? ही त्यांची सुरुवात असून एक एक पाऊल पुढे टाकत सगळ्या गोष्टी गिळकृंत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांचा तो नारा आहे ना, ‘बटेंगे तो कटेंंगे’, तो तसा नाही. ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे,’ असा आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी-शाह यांच्या घोषणेला प्रत्युत्तर दिले.
दीपक साळुंखे यांच्या प्रचारानिमित्त सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत होते. ते म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे. सहकार हा राज्याचा विषय आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच केंद्रात सहकार खातं तयार करण्यात आलं आणि अमित शाह यांनी ते खातं स्वतःकडं ठेवलं. छापे पडल्यानंतर सगळी भाजपकडे पळत आहेत. पण, भाजपची नीती ही वापरा आणि फेकून द्या, अशी आहे. हे अजित पवार आणि इतरांच्या लक्षात येत नाही. काम झाल्यानंतर फेकून द्यायचं ही भाजपची नीती आहे.
भाजपने आजच सुरू केलंय. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे त्यांचे मुख्यमंत्री असतील. मिंद्येंना बस म्हणावं भांडी घासत आणि या झाडी डोंगारवाल्यांना म्हणावं मिंद्येंना भांडी घासण्यासाठी माती द्यायला बसं म्हणावं. तुमचा उपयोग संपला, अशी टीका ठाकरेंनी केली.
ठाकरे म्हणाले, अमित शहा (Amit Shah) यांनी मला काश्मीरची आठवण करून दिली. ते तुम्हाला कोणालाही माहिती नाही. मोदी शहा जेव्हा महाराष्ट्रात भाषण करत होते, तेव्हा मणिपूरमध्ये एका महिलेवर अत्याचार होत होता. त्या महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत जाळण्यात आले. तुम्ही उद्धव ठाकरेंना संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे लोक हिंसाचार करतात, त्यांना संपवून दाखवा. मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा.
तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीत तुमचा पक्ष जिंकावा, असं वाटत असेल तर पंतप्रधानपद सोडा, गृहमंत्रीपद सोडा आणि जसं आम्ही आमच्या पक्षाचं स्टार प्रचारक म्हणून फिरतोय, तसं मोदी आणि शहा यांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे. तुम्ही मन की बात करता पण आम्ही जन की बात करतोय. हा त्यांच्यात आणि आपल्यात फरक आहे, असा दावाही ठाकरेंनी केला.
‘तुम्ही आम्हाला अपशकून करू नका’
सांगोल्यात जे कोणी अपक्ष उभे राहिले आहेत. पण, महाविकास आघाडीचा एकच उमेदवार आहे, ते म्हणजे दीपकआबा. त्यांच्या हातात मशाल आहे. बाकीचे बंडखोर आणि पक्षाला भीक घालायची नाही. मी तर म्हणेन हे अपक्ष उभे राहून महायुतीला मदत करण्यासाठी आम्हाला अपशकून करत आहेत. तुम्ही आम्हाला अपशकून करू नका नाही तर महाराष्ट्राचे शाप तुम्हाला लागतील. महाराष्ट्र प्रत्येकाला देत आलेला आहे. पण महाराष्ट्राच्या पायावर हा धोंडा पाडू नका, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी अपक्ष उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना नाव न घेता केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.