Rajan Patil-Umesh Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil Vs Umesh Patil : उमेश पाटलांनी कायम ठेवली राजन पाटील विरोधाची धार; ‘खरेदीखतासाठी मोहोळमध्ये यायला कुणाला भीती वाटते?’

Mohol Politic's : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर होताच उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील हे सध्या उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत आहेत. दोन्ही पाटील एकाच राष्ट्रवादीत आल्यानंतर दोघांमधील विरोधाचे वातावरण निवळेल, अशीच शक्यता सर्वांना वाटत होती. मात्र, मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर होताच उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. (Umesh Patil maintained the edge of opposition to Rajan Patil)

आम्ही (राजन पाटील आणि मी) एकाच पक्षात आणि एकाच नेत्याच्या नेतृत्वात काम करत असलो तरीही मोहोळ तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाच्या विरोधात जर कोणी काम करत असेल, तर त्याला माझा व्यक्तिगत पातळीवर विरोध राहील, असे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी ठणकावले. नव्याने मंजूर झालेले अनगरचे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय रद्द करून ते कार्यालय कामती किंवा कुरुल येथे मंजूर करावे, याबाबत मी व्यक्तीश: महसूलमंत्र्यांना विनंती करणार असल्याचेही उमेश पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले की, मोहोळ तालुक्यात अनगर येथे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय मंजूर झाल्याचे शासन आदेश आला आहे. पण, मोहोळ येथे अस्तित्वात असलेले दुय्यम उपनिबंधक कार्यालय पूर्ण क्षमतेने वापरले जात नाही, त्यामुळे त्याच तालुक्यात दुसऱ्या कार्यालयाची आवश्यकता नसल्याचा अहवाल असताना केवळ स्वत:च्या गावात एखादे महत्त्वाचे शासकीय कार्यालय आणले, हे त्या भागातील नागरिकांना दाखवण्यासाठी हा अट्टाहास आहे. हा सरकारच्या निधीचा आणि सत्तेचा गैरवापर आहे.

दुसरे दुय्यम उपनिबंधक कार्यालय आणायचेच होते, तर ते कुरुल किंवा कामती भागात आणायला हवे होते. त्या भागातील लोकांना अंतराच्या दृष्टिकोनातून कामती पोलिस ठाण्याप्रमाणे दुसरे उपनिबंधक कार्यालय मंजूर केले असते, तर ते लोकांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरले असते. पण, अनगरला दुय्यम उपनिबंधक कार्यालय हे कुणाच्या सोयीसाठी करण्यात येत आहे? मोहोळमध्ये उजळ माथ्याने येऊन खरेदीखते करायला कुणाला भीती वाटत आहे?

आज दुय्यम उपनिबंधक कार्यालय अनगरला नेले, उद्या क्रीडा संकुल जाईल व याच अनगरकरांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर मोहोळचे तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, ग्रामीण रुग्णालय, महावितरण मुख्यालय, वन विभागाचे कार्यालय, पंचायत समिती तसेच अजितदादांनी मंजूर केलेली २५ कोटींची प्रशासकीय इमारतही अनगरलाच जाण्याची भीती उमेश पाटील यांनी व्यक्त केली. प्रशासकीय सुविधांचा विचार न करता अतिशय संकुचित मनोवृत्तीचे प्रदर्शन करत स्वत:च्या गावापुरताचा स्वार्थी विचार मोहोळ तालुका सहन करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT