Ajit Pawar-Umesh Patil-Rajan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Umesh Patil Vs Rajan Patil : उमेश पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेश राजन पाटलांची डोकेदुखी वाढविणार की....!

Mohol NCP News : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवासांतच उमेश पाटील यांनी आपण अजितदादांबरोबर असल्याचे विधान केले होते, त्यामुळे पाटील यांची घरवापसी कधी होणार, अशी चर्चा मोहोळ तालुक्यात होती.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 February : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नामुष्कीजनक टीकेनंतर पक्षापासून दुरावलेले उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, ज्या कारणामुळे उमेश पाटील हे पक्षापासून लांब गेले होते, ते मोहाळाचे माजी आमदार राजन पाटील आजही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांसोबत कायम आहेत, त्यामुळे उमेश पाटील यांनी राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केला आहे, त्यामुळे स्थानिक संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण एकाच म्यानात दोन तलवारी किती दिवस राहणार, खरा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मोहोळमध्ये जनसंघर्ष यात्रा आणि लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात तत्कालीन आमदार यशवंत माने यांनी व्यासपीठावरून जाहीरपणे उमेश पाटील (Umesh Patil) यांची पक्षप्रमुखांकडे तक्रार केली होती.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणतीही बेशिस्त खपवून घेणार नाही’, असा इशारा दिला होता, तर अजितदादांनी अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे दुखावलेल्या उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. नरखेडमधील मेळाव्यात कार्यकर्त्यांनी उमेश पाटलांनी अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडावी, असे आवाहन केले होते. तसेच, एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचा प्रयत्नही केला होता, त्यानंतर त्यांनी अजित पवारांना सोडण्याचा निर्णय जवळपास बोलूनही दाखवला होता.

अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून तत्कालीन आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांचा पराभव करण्याचा पण उमेश पाटील यांनी मांडला होता त्यासाठी त्यांनी पक्षापासून हरकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजू खरे यांच्यासाठी आपली ताकद पणाला लावली होती, त्यात त्यांना मोहोळमधील सर्वपक्षीय नेत्यांचीही साथ मिळाली होती. या सर्व कारणांमुळे राजू खरे हे अवघ्या पंधरा दिवसांत आमदार म्हणून निवडून आणत राजन पाटील यांचे वर्चस्व मोडीत काढले होते.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र काही दिवासांतच उमेश पाटील यांनी आपण अजितदादांच्या बरोबर असल्याचे विधान केले होते, त्यामुळे उमेश पाटील यांची घरवापसी कधी होणार, अशी चर्चा मोहोळ तालुक्यातील असतानाच मंगळवारी सायंकाळी देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेशमध्ये प्रवेश केल्यामुळे माजी आमदार राजन पाटील यांची डोकेदुखी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण, या दोन पाटलांमधील संघर्ष अजूनपर्यंत थांबलेला नाही. शिवाय विधानसभेला पराभव झाल्यामुळे राजन पाटील गटही आक्रमक होण्याची शक्यता आहे. मोहोळमधील मातब्बर नेते एकाच छताखाली किती दिवस राहणार, हा खरा प्रश्न आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेश पाटील आणि राजन पाटील या दोन पाटलांमध्ये पुन्हा एकदा वाक्‌युद्ध रंगण्याची शक्यता आहे. उमेदवारी वाटपावरून या दोन गटांत संघर्ष होण्याची शक्यता आहे, त्यामुळे उमेश पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरा पण पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT