
पांडुरंग म्हस्के
Guardian Minister Dispute : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फारच चलाखीने पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आणि ते दावोसला जागतिक आर्थिक परिषदेला निघून गेले. या नेमणुकीने महायुतीमध्ये वाद झालाच तर आपण येईपर्यंत तो बहुधा निवळलेला असेल, असा त्यांचा कयास असावा. मात्र त्यांच्या दुर्दैवाने तसे झाले नाही, आणि अवघ्या चोवीस तासात त्यांना रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नावाला स्थगिती द्यावी लागली.
रायगडच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे यांची तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी भाजपचे गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र या नियुक्तीने शिवसेनेच्या गोटात नाराजी निर्माण झाली.
संबधित जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आपली तीव्र नाराजी आपले नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर मांडली. खुद्द शिंदेही नाराज झाले. त्यांच्या हट्टापुढे या दोन नावांना स्थगिती द्यावी लागली. महाराष्ट्रात मंत्रिपदाचा वाद शिगेला पोहोचला आहेच परंतु पालकमंत्रिपदावरून महायुतीतील वाद देखील चव्हाट्यावर आला आहे. पर्यायाने महाराष्ट्र सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुळात महायुतीच्या सरकारमधील पालकमंत्रिपदाचे वाटप करण्यात आले. यात अनेक मंत्र्यांना पालकमंत्रिपदापासून वगळण्यात आले. त्यावरून मंत्र्यांमध्ये नाराजी होतीच. मात्र पालकमंत्रिपदावरून नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा कलगीतुरा सुरु झाला. गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री करण्यात आले होते. यामुळे दादा भुसे नाराज झाले. तर, रायगडमध्ये अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्याने मंत्री भरत गोगावले नाराज झाले. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात आली असली, तरी ही स्थगिती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच चपराक आहे.
पालकमंत्रिपदावरून रायगडमध्ये मोठा राडा देखील झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०२२ मध्ये महायुतीमध्ये सामील होऊन मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनच त्यांचे आमदार भरत गोगावले हे मंत्रिपदाच्या वाटेवर डोळे लावून बसले होते. मात्र मागील सत्ता काळात त्यांची डाळ शिजली नाही. अखेर या निवडणुकीनंतर त्यांचे घोडे गंगेत न्हाले. मात्र पालकमंत्रिपदासाठीही त्यांनी हट्ट धरल्याने याठिकाणीसुद्धा अजित पवार यांना माघार घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुळात रायगडच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती मिळवून त्यांनी राष्ट्रवादी विरुद्धची अर्धी लढाई तर जिंकली आहेच. मात्र त्याला अजित पवार कसे उत्तर देतात हे पाहणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध शिवसेना हा वाद अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यापासूनच सुरु आहे. आता महायुतीमधील सर्वच पक्षांना अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्यानंतर धुसफूस कमी होईल अशी चिन्हे होती. मात्र गोगावले आणि तटकरे यांची रायगड जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे काही जुळताना दिसत नाहीत.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे सामूहिक राजीनामे दिले. रायगडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीला दिल्याने निषेध व्यक्त करत मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शने केली.
रायगडचे पालकमंत्रिपद मिळावे म्हणून शिवसेना जेवढी आक्रमक झाली तेवढी राष्ट्रवादी काँग्रेस झालेली नाही. अजूनही अजित पवार हे बोटचेपी भूमिकाच घेत आहेत. पक्षाचे प्रवक्ते मात्र कार्यालयात बसूनच शिवसेनेला इशारे देण्याचे काम करीत आहेत. याउलट शिंदे आपली आणि आपल्या आमदारांची बाजू लावून धरत त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घ्यायला मुख्यमंत्री फडणवीस यांना भाग पडत आहेत. असाच याचा अर्थ निघतो. या उलट शिंदे यांचे आमदार आणि मंत्री असलेले गोगावले मात्र सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत.
तटकरे यांनी आपल्याला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांचा आरोप आहे. महायुतीमध्ये सुरु असलेली धुसफूस अशा प्रकारे चव्हाट्यावर येणे महायुतीला परवडणारे नाहीच परंतु पवार यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षावर होत असलेले आरोप फारच गंभीर आहेत. त्यामुळे, आक्रमक नेते म्हणून ख्याती असलेले पवार शिंदे यांच्या सोबतच्या वादात मात्र माघार घेत असल्याचे दिसत आहेत. आताही या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाबाबत महायुतीच्या चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. मात्र तरीही पवार यांना फारसे काही हाती लागेल असे दिसत नाही.
रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसला, तरी शिवसेनेचे रायगड मधील नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी आता तटकरे यांना व्यक्तिगत लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच टीकेची पातळी घसरत चालली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर व्यक्तिगत टीका शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी सुरु केली आहे.
त्यामुळे हा वाद आता आणखीच चिघळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राजकीय आरोप करणे ठीक आहे परंतु अशा प्रकारे व्यक्तिगत आणि खासगी आरोप जर महायुतीमध्ये एकमेकांवर केले जाणार असतील तर महायुती टिकविणे हे महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अवघड जाणार आहे हे निश्चित. परंतु निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात खडे फोडणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या मातृसंस्थेनंतर शिवसेना (शिंदे गट) अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे चांगलाच लागला असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.