Dilip Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विधानसभेची आगामी निवडणूक ‘सोलापूर दक्षिण’मधूनच लढणार : दिलीप मानेंनी थोपटले दंड!

सोलापूर दक्षिणमध्ये आमदार म्हणून काम करताना या मतदार संघाच्या विकासासाठी मी सर्वाधिक निधी मिळवून विकास कामे केली आहेत.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : सोलापूर (Solapur) दक्षिणमध्ये आमदार म्हणून काम करताना या मतदार संघाच्या विकासासाठी मी सर्वाधिक निधी मिळवून विकास कामे केली आहेत. मतदार संघावर आलेल्या संकटाच्या काळात मी सदैव जनतेच्या पाठीशी राहिलो. मतदार संघातील प्रश्‍न सोडविण्यासाठी मी वेळप्रसंगी सरकारच्या विरोधात संघर्ष केला. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या विश्‍वासावर आगामी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) मी ‘सोलापूर दक्षिण’मधूनच लढणार आहे, असा शब्दांत माजी आमदार दिलीप माने यांनी विद्यमान भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुखांना आव्हान दिले. (Upcoming assembly elections will be contested from 'Solapur South': Dilip Mane)

दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथील एस. एम. फाउंडेशनचे अध्यक्ष सागर माने व मित्र परिवाराने माजी आमदार माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात माजी आमदार माने बोलत होते. दिलीप माने यांनी २००९ ते २०१४ या काळात काँग्रेसचे आमदार म्हणून या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यांनी २०१९ मध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना शिवसेनेच्या तिकिटावर आव्हान दिले होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपण सोलापूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे माने यांनी स्पष्ट केले आहे. त्या दृष्टीने त्यांनी या मतदारसंघात संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.

ते म्हणाले की, जनतेची सेवा करण्याचे संस्कार (स्व.) ब्रह्मदेव माने यांनी आमच्यावर केले आहेत. सीना नदीत पाणी सोडणे, मतदारसंघातील विजेचा प्रश्‍न, पूरग्रस्त भागाच्या समस्या, अवर्षणग्रस्त परिस्थिती अशा बिकट परिस्थितीत आपण शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी, विकास कामांना निधी मिळविण्यासाठी वेळप्रसंगी सरकारशी केला.

दरम्यान,भारतीय जनता पक्षाचे सुभाष देशमुख हे या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत देशमुख यांनी माने यांचा पराभव केला होता. त्यानंतर माने यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. आगामी निवडणुकीत माने आणि देशमुख यांच्यामध्ये पुन्हा एकदा ‘काँटे की टक्कर’ पहायला मिळू शकते.

माजी आमदार माने यांनी सरपंच अतुल गायकवाड, उपसरपंच असिम शेख, संजय जाधव, राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्षा दिलखूष तांबोळी, गेनसिध्द शेंडगे यांच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी प्रसंगी प्रहार संघटनेचे मोमीन तांबोळी, शिवसेना तालुकाध्यक्ष गंगाराम चौगुले व इतर मान्यवर उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT