Sumantai Patil-Dhananjay Munde  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sumantai Patil Letter To Munde : सुमनताई पाटील यांच्या पत्रावर कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे सचिवांना तातडीने आदेश

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात द्राक्ष, डाळिंब आणि हळदीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या ठिकाणी द्राक्ष, डाळिंब आणि हळदीचे संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी आमदार सुमनताई पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली. सुमनताई या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असूनसुद्धा धनंजय मुंडे यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा प्रकारचे आदेश सचिवांना दिले आहेत. (Urgent order of Agriculture Minister Dhananjay Munde to Secretary on Sumantai Patil's letter)

तासगाव -कवठे महांकाळ मतदारसंघाचा काही भाग दुष्काळी आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे विशेष साधन नाही. मात्र, द्राक्ष, डाळिंब या पिकांचे उत्पादन घेऊन शेतकरी पाणी कमी असतानाही चांगल्या प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही शेती करताना संशोधन केंद्र झाल्यास शेतकऱ्यांना आणखी मदत होईल, त्यामुळे (स्व.) आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील (Suman Patil) यांनी नवनिर्वाचित कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना पत्र दिले आहे.

आमदार सुमनताई पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी अत्यंत कमी पाण्यावर तयार होणऱ्या द्राक्ष, डाळिंब, आले, हळद व इतर पिकांच्या उत्पादनातून कृषी क्रांती घडवून आणली आहे. द्राक्ष, डाळिंब या पिकांचे नवनवीन वाण निर्माण करून नावलौकीक मिळविला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही.

कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी येथे शेळी-मेंढी प्रकल्पाच्या जागेत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मार्फत कृषी संशोधन केल्यास शेतकऱ्यांना फायद्याचे होईल. या कृषी संधोधन केंद्रास लागणारी जमीनही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे द्राक्षे, डाळिंब, आले, हळद व इतर पिकांच्या संशोधनासाठी महात्मा फुले कृषी संशोधन केंद्र रांजणी येथे उभारण्यात यावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी पत्रातून केली आहे.

आमदार सुमनताई पाटील यांच्या पत्रावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रस्ताव सादर करावा, अशा प्रकारचे आदेश सचिवांना दिले आहेत. धनंजय मुंडे हे अजितदादा गटात आहेत, तर सुमनताई यांनी शरद पवार यांच्याच गोटात राहण्यास पसंत केले आहे. तरीही मुंडे यांनी या संशोधन केंद्रासाठी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. धनंजय मुंडे आणि (स्व.) आर. आर. आबांचे संबंध खूप सलोख्याचे होते. त्याच पार्श्वभूमीवर संशोधन केंद्रासाठी प्रयत्न करणे याला एक भावनिक जोड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT