Uttam Jankar-Nagesh Vankalse-Bharat Waghmare
Uttam Jankar-Nagesh Vankalse-Bharat Waghmare Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Loksabha News : मराठा समाजाकडून सोलापूरसाठी जानकर, वाघमारे, व्हनकळसे चर्चेत; माढ्यासाठी २९ अर्ज

अरविंद मोटे

Solapur, 29 March : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात प्रत्येकी एक उमेदवार देण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने घेतला आहे. लोकसभेच्या रिंंगणात उतरण्यासाठी मराठा समाजाकडे बडी नावे चर्चेत आहेत. त्यात सोलापूर मतदारसंघातून लढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर, उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि मोहोळचे नागेश व्हनकळसे हे इच्छुक आहेत. माढ्यासाठी तब्बल २९ इच्छुकांनी अर्ज केले आहेत, त्यामुळे सोलापूर आणि माढ्यातून मराठा समाज तगडे उमेदवार देणार हे आता स्पष्ट आहे.

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील बैठकीत ठरल्याप्रमाणे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातून सकल मराठा समाजाच्या वतीने उमेदवार देण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाची माढ्यासाठी गुरुवारी (ता. २८ मार्च) माळशिरस येथे बैठक झाली. त्या बैठकीत माढ्यातील उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली. या वेळी तब्बल २९ इच्छुकांनी माढ्यातून निवडणूक लढविण्यासाठी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या (Solapur Lok Sabha Constituency) उमेदवारीसंदर्भात आज सोलापूर शहरात बैठक होणार आहे. मतदारसंघातील मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, सोलापूर शहरातील सकल मराठा समाज बांधव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत सोलापूरच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माळशिरसमधील नेते उत्तम जानकर (Uttam Jankar), उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे आणि मोहोळचे नागेश व्हनकळसे यांची नावे सोलापूर लोकसभेसाठी चर्चेत आहेत. या तीन नावांपैकी व्हनकळसे हे सोलापूर मतदारसंघातील मोहोळचे आहेत. त्यांनी काही महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे.

कोणत्या तालुक्यातून किती अर्ज

माढा लोकसभा मतदारसंघासाठी (Madha Lok Sabha Constituency) पंढरपूरमधून ३, करमाळ्याचे ३, सांगोल्यातून ३, माळशिरसमधून ९, माढ्यातून ७, माणमधून ३, तर फलटणमधून १ अर्ज आला आहे.

सोलापुरातून लढण्यासंदर्भात विचार करेन : जानकर

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक लढविण्यासंदर्भात मला मराठा समाजाकडून अद्याप विचारणा करण्यात आलेली नाही. मात्र, मला विचारण्यात आले तर मी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भात नक्की विचार करणार आहे.

माझी दावेदारी प्रबळ : व्हनकळसे

सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मोहोळचा मी रहिवासी आहे. त्यामुळे मी स्थानिक उमेदवार असणार आहे. स्थानिकांच्या दृष्टीने माझी दावेदारी सर्वात प्रबळ आहे, असे मोहोळचे नागेश व्हनकळसे यांनी स्पष्ट केले.

....हा तर खोडसाळपणा : वाघमारे

सोलापूर लोकसभा लढण्यासंदर्भात उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे म्हणाले, कोणीतरी हा खोडसाळपणा केलेला आहे. मी सध्या शासकीय सेवेत आहे. पण, निवडणूक लढविण्याचा माझा अजिबात विचार नाही.

Edited By : Vijay Dudhale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT