Ajit Pawar Vaibhav Patil
Ajit Pawar Vaibhav Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli NCP News : विट्याचे पाटील जयंतरावांच्या तालुक्यात करणार अजितदादांचा जंगी सत्कार !

संपत मोरे

Sangli News : सांगली जिल्ह्यातील शरद पवार गटाचे (Sharad Pawar Group) नेते व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील (Vaibhav Patil) यांनी उद्या रविवारी (ता. ९ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांचे भव्य स्वागत करण्याचा सांगावा आपल्या कार्यकर्त्यांना पाठवल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

माजी नगराध्यक्ष असलेल्या पाटील यांनी आगामी राजकारण अजितदादा पवार यांचे बोट धरून करण्याचा निर्णय घेतल्याने, याचा सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे स्वागत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यातील केदारवाडी येथे होणार आहे.

वैभव पाटील यांचे आजोबा माजी आमदार हणमंतराव पाटील यांनी 1980 साली शरद पवार यांच्या अडचणीच्या काळात पाठराखण केली होती, तेव्हा अनेक आमदार पक्ष साेडून गेले होते. पण पाटील मात्र शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत राहिले होते. 1999 साली पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हा वैभव पाटील यांचे वडील, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनीही शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. वैभव पाटील हेही राष्ट्रवादीत आहेत. विट्याच्या पाटील घराण्याच्या तीन पिढ्यांची निष्ठा शरद पवार यांच्यासोबत राहिली आहे. आता मात्र पाटील घराणे राजकीय भूमिका बदलण्याच्या मानसिकतेत आहेत, असे स्पष्ट झाले आहे.

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रभावामुळे अजितदादा पवार यांच्यासोबत जाण्याचे धाडस कोणी केले नव्हते. मात्र, वैभव पाटील यांनी जयंत पाटील यांच्या तालुक्यात अजितदादा यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते मंडळींना निरोप दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

'सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आमचे खच्चीकरण केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कसलीच ताकद मिळाली नाही. विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पुरस्कृत लढवली असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आटपाडी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आणि विसापूर गटातील कार्यकर्त्यांनी विरोधात काम केले. त्याबाबत वरिष्ठांना कळवूनही काहीही झाले नाही,' असे पाटील म्हणाले.

'महाविकास आघाडी सत्तेत असतानाही पाटील गटाला ताकद मिळाली नाही,' असे पाटील गटाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट ) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाळवा तालुक्यात विट्याचे पाटील अजितदादांचा जंगी सत्काराचा कार्यक्रम करत आहेत. ही घटना खानापूर, तासगाव विधानसभा आणि सांगली लोकसभा निवडणुकीवर परिणाम घडवून आणणार, असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT