Vedant Bandgar Murder Case | Nilesh Gadde | Miraj Crime Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Police : गडदेच्या आदल्या दिवशीच्या गोळीबाराकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं नसतं तर वेदांतचा जीव वाचला असता; 'त्या' पोलीस निरिक्षकावर कारवाई होणार का?

Vedant Bandgar Murder Case : वेदांत बंडगर हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कुख्यात गुंड नीलेश गडदेचा साथीदार अतुल पोपट उर्फ दादासो वायदंडे (वय २६, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Jagdish Patil

Sangli Crime News, 15 Jun : हमाल नेते बाळासाहेब बंडगर आणि सांगली बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर याच्या हत्येप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिसांनी आणखी एक आरोपी अटक केला आहे.

या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या कुख्यात गुंड नीलेश गडदेचा साथीदार अतुल पोपट उर्फ दादासो वायदंडे (वय २६, रा. खंडेराजुरी, ता. मिरज) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जत पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. नीलेश गडदे याने यापूर्वी जत पोलिस ठाण्याबाहेर पिस्तूल काढून दहशत निर्माण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच बाज (ता. जत) गावातही त्याने आदल्या दिवशी गोळीबार केल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली होती. या घटनांवर वेळीच कारवाई झाली असती, तर वेदांतचा जीव वाचू शकला असता, असा आरोप होत असून जतचे पोलिस निरीक्षक यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी या मागणीची दखल घेत चौकशीअंती दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल, असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यात रेल्वे मालधक्क्यावरील कामाच्या ठेक्यावरून दोन गटांमध्ये वाद सुरू होता. या कामाचा ठेका लक्ष्मण पांडुरंग खरात यांच्याकडे असून, त्यांनी कामातून माघार घ्यावी यासाठी नीलेश गडदे याच्याकडून दबाव आणला जात होता.

बुधवारी सायंकाळी गडदे आपल्या दोन साथीदारांसह खरात यांच्या घरी गेला. त्यावेळी खरात घरी नसल्याने त्यांच्या पत्नीला धमकावले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाळासाहेब बंडगर जत येथे पोहोचले.

त्यानंतर दुपारच्या सुमारास जत पोलिस ठाण्याच्या परिसरात दोन्ही गटांतील व्यक्ती समोरासमोर आल्या. यावेळी संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक केली. या प्रकारामुळे संतापलेल्या गडदेने बाळासाहेब बंडगर यांना लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचे तपासातून उघड झालं आहे.

यानंतर गडदे सांगलीला गेला आणि बंडगर यांच्यावर हल्ला करण्याऐवजी घराच्या अंगणात मोबाईल पाहत बसलेल्या नातू वेदांतवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात वेदांतचा मृत्यू झाला. या गुन्ह्यात अतुल वायदंडेचा सहभाग असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले असून त्याआधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वायदंडेविरोधात पूर्वीपासून गुन्हे

अटक करण्यात आलेल्या अतुल वायदंडेवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. खंडेराजुरी येथे लग्नाच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादातून एका व्यक्तीच्या खूनप्रकरणात त्याचे नाव समोर आले होते. त्याच्याविरोधात अन्य गंभीर गुन्ह्यांचीही नोंद असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

तर या हत्याकांडात एका निष्पाप मुलाचा बळी गेल्याने परिसरात संतापाचे वातावरण असून या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजप नेत्या नीता केळकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT