Karad, 26 April : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कोमात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सह्याद्री सहकारी साखर कारखान्यातील विजयामुळे जबरदस्त टॉनिक मिळाले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांचा उत्साह वाढला आहे. उलट विधानसभा निवडणुकीनंतर बरे दिवस आलेल्या भारतीय जनता पक्षाला गृहकलहाने ग्रासले आहे. त्यातूनच भाजपचे आमदार मनोज घोरपडे विरुद्ध जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ यांच्यातील मतभेट थेट चव्हाट्यावर आले. नाव न घेता त्यांनी एकमेकांच्या उखळ्यापाकळ्या काढल्या. भाजपमधील अंतर्गत कलह लवकर शांत होईल, असे सध्या तरी वाटत नाही. त्याची मोठी किंमत भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोजावी लागण्याची जास्त शक्यता आहे.
दरम्यान, पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड उत्तर आणि कऱ्हाड दक्षिणमध्ये दोन्ही राष्ट्रवादी बळकट होताना दिसत आहेत. सह्याद्रीतील (Sahyadri Sugar Factory ) विजयामुळे कऱ्हाड उत्तरमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये उत्साह संचारला आहे, तर कऱ्हाड दक्षिणमध्ये ज्या विलासराव पाटील उंडाळकर यांनी अनेक वर्षे आमदारकी ताब्यात ठेवली, त्यांचे चिरंजीव ॲड उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे, त्यामुळे बालेकिल्ल्यात दोन्ही राष्ट्रवादीने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे.
कऱ्हाड उत्तर हा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सातारा, खटाव, कोरेगाव आणि कऱ्हाड तालुक्यातील गावे सहभागी आहेत, त्यामुळे चार तालुक्यांत कऱ्हाड उत्तर मतदारसंघ विभागला आहे. आतापर्यत चव्हाण, पी. डी. पाटील आणि बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, भाजपने २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गडाला भारतीय जनता पक्षाने सुरुंग लावला आणि मनोज घोरपडे हे प्रथमच बिगर काँग्रेसी आमदार निवडून आले.
विधानसभा निवडणूक जिंकलेले मनोज घोरपडे यांनी काहीही करून सह्याद्री साखर कारखान्यात विजय मिळवायचा, असा निर्धार केला होता. त्या दृष्टीने त्यांनी जुळवाजुळवही केली होती. दुसरीकडे, विधानसभेतील पराभावामुळे खडबडून जागे झालेल्या माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील नव्या जोमाने कामाला लागले. साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सुमारे १९१ गावांत पायाला भिंगरी बांधून संपर्क वाढविला. मतदार, सभासदांनी संवाद साधून कारखान्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवली.
उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ, काँग्रेसचे निवास थोरात यांच्यात एकमत झाले नाही. सह्याद्रीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांमध्ये अखेर फूट पडली, त्यामुळे सह्याद्रीमध्ये सत्ताधारी पाटील यांचा एक पॅनेल आणि विरोधकांचे दोन असे तीन पॅनेल रिंगणात उरतले. तिथेच बाळासाहेब पाटील यांच्या बाजूंनी निकाल लागणार, याचे संकेत मिळाले होते आणि झालेही तसेच बाळासाहेब पाटील यांचा पॅनेल तब्बल आठ हजार मतांच्या फरकाने विजयी झाले.
सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला टॉनिक मिळाले आहे. शरद पवार यांच्या पक्षाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बळ मिळाले. पवारांच्या उपस्थितीत बाळासाहेब पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
भारतीय जनता पक्षात सह्याद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे फूट पडली. भाजपचे आमदार मनोज घोरपडे एका बाजूला, तर जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ अशी पक्षीय विभागणी झाली आहे, त्यातून भाजपमध्ये अंतर्गत कलह वाढत गेला. निवडणुकीत तर एकमेकांवर शेलक्या शब्दांत हल्ले करण्यात आले, त्यामुळे भाजपमधील नेत्यांचे अंतर वाढत गेले. भाजपमधील अंतर्गत कलह हा लवकर थांबण्याची चिन्हे नाहीत. हा कलह न थांबल्यास आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला त्याची किंमत मोजावी लागू शकते.
बालेकिल्ल्यासाठी अजितदादा मैदानात
एकदा अपवाद वगळता सातारा जिल्ह्यातून एकेकाळी सर्वच्या सर्व आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून यायचे. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे दोन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे अजितदादांनी सातारा जिल्ह्यात पक्षबांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यातूनच राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांच्या माध्यमातून ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी काँग्रेसचे ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना गळाला लावत कऱ्हाड दक्षिणमध्ये राष्ट्रवादी मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. उंडाळकर हे कऱ्हाड दक्षिणचे नेते असले तरी कऱ्हाड उत्तरेतही त्यांचा गट कार्यरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.