Khed Panchayat Samiti Sabahapati Election Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Khed Politic's : ठाकरेंच्या आमदाराने मोहितेंना पुन्हा डिवचले; गावातच सभापतिपद देऊन राजकारणाला शह देण्याचा मोठा डाव!

Panchayat Samiti Sabahapati : खेड पंचायत समितीवर शिवसेना ठाकरे गटाचा सभापती निवडून आला. आमदार बाबाजी काळे यांनी शेलपिंपळगावात सभापतिपद देत माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या राजकारणाला जोरदार राजकीय शह दिला.

राजेंद्र सांडभोर

Rajgurunagar, 09 March : खेड पंचायत समितीवर पुन्हा एकदा भगवा फडकला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांनी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या शेलपिंपळगावातच सभापतिपद देऊन त्यांच्या राजकारणाला शह देण्याचा मोठा डाव टाकला आहे. वर्षभरापूर्वी नवनिर्वाचित सभापतींच्या पतीने मोहिते गटातून विरोधी गटात जाऊन बाजार समितीची सभापती हिसकावली, त्यानंतर त्यांच्या पत्नीला सभापतिपद देऊन आमदार काळे यांनी माजी आमदार मोहितेंना चांगलेच डिवचले आहे.

खेड पंचायत समितीच्या (Khed Panchayat Samiti) सभापतिपदी शिवसेनेच्या विद्या मोहिते यांची, तर उपसभापतिपदी मंगेश सावंत हे निवडून आले आहेत. या निवडीमुळे शिवसेनेची पुन्हा एकदा पंचायत समितीवर सत्ता आली आहे.

खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत १६ सदस्यांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) ९, राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ आणि शिवसेनेचा १ सदस्य निवडून आला होता. त्यामुळे ठाकरेसेनेची सत्ता येणार हे निश्चित होते. मात्र, एखाद दुसऱ्या सदस्याने वेगळी भूमिका घेतली, तर खेडच्या राजकारणाला कलाटणी मिळण्याची शक्यता होती, त्यामुळे शिवसेना उबाठा गटाने आपले न‌ऊही सदस्य गेले महिनाभर सुरक्षितस्थळी हलविले होते. ते थेट आज निवडीच्या वेळी तालुक्यात आले.

शिवसेनेकडून सभापतिपदासाठी विद्या मोहिते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अश्विनी तरस यांनी अर्ज भरला होता. उपसभापतिपदासाठी शिवसेनेकडून मंगेश सावंत, तर राष्ट्रवादीकडून निखिल थोरवे यांनी उमेदवारी देण्यात आली होती. सभापती आणि उपसभापतिपदासाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. सभापतिपदाच्या निवडीत शिवसेनेच्या मोहिते यांना ९, तर राष्ट्रवादीच्या तरस यांना ७ मते पडली.

उपसभापतिपदावेळीही शिवसेनेच्या सावंत यांना ९ आणि थोरवे यांना ७ मते पडली. त्यामुळे सभापतिपदी मोहिते आणि उपसभापतिपदी सावंत निवडून आल्याचे दौंडे यांनी जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना शिंदेसेनेने पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले.

आमदार बाबाजी काळे यांनी पंचायत समितीचे सभापतिपद हे माजी आमदार दिलीप मोहिते यांच्या शेलपिंपळगाव येथील विद्या सयाजी मोहिते यांना देऊन मोहितेंच्या राजकारणाला बालेकिल्ल्यातच शह देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माजी आमदार मोहितेंच्या पॅनेलमधून निवडून आलेले विद्या मोहिते यांचे पती सयाजी मोहिते हे वर्षभरापूर्वी विरोधकांन जाऊन मिळाले होते, त्यामुळे दिलीप मोहितेंची बाजार समितीवरील सत्ताही गेली होती.

त्याच सयाजी मोहिते यांच्या पत्नी विद्या यांना पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली होती. निवडून आल्यानंतर विद्या मोहिते यांच्याच गळ्यात सभापतिपदाची माळ टाकून माजी आमदार मोहिते यांना शह दिल्याचे मानले जात आहे. त्यामुळे विरोधकांच्या या डावाला माजी आमदार मोहिते कशा पद्धतीने कटशह देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

मागच्या वेळी गद्दारांनी पक्षाचा विश्वासघात केला होता

गेल्या वेळीही खेड तालुक्यातील जनतेने शिवसेनेच्या ताब्यात पंचायत समिती दिली होती. पण, काही गद्दारांनी पदे उपभोगून पक्षाचा विश्वासघात केला. त्यांना जनतेने जागा दाखवून दिली आहे. त्यांना यापुढे कधीही पंचायत समितीत पाऊल ठेवता येणार नाही, असा टोला आमदार बाबाजी काळे यांनी लगावला.

आमच्या मागे अदृश्य शक्ती; जिल्हा बॅंकेतून माजी आमदारांना हद्दपार करू

तालुक्यातील सर्व संस्था लोकांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात दिल्या आहे, त्यामुळे रात्रंदिवस तालुक्याच्या सेवेसाठी आम्ही काम करु. आमच्या मागे अदृश्य शक्ती असल्यामुळे तालुक्याचे एकही काम प्रलंबित राहणार नाही. सर्व संस्थांमधून माजी आमदारांना मतदारांनी हद्दपार केले असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतूनही त्यांना हद्दपार करु, असा इशारा काळे यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT