Junnar Sabhapati : जुन्नरमध्ये ठाकरेंचा आदेश झुगारला: एकमेव सदस्याचा शिंदेसेनेसोबत घरोबा; उपसभापतिपदाची लॉटरी, निवडीवेळी राडा

Shivsena VS NCP : जुन्नर पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्याने शिंदे गटासोबत जात उपसभापतिपद मिळवले. आमदार शरद सोनवणे यांच्या खेळीने माजी आमदार अतुल बेनके यांचे सत्तेचे स्वप्न भंगले.
Junnar Sabhapati Election
Junnar Sabhapati ElectionSarkarnama
Published on
Updated on

Junnar, 09 March : जुन्नर पंचायत समितीच्या सभापती-उपसभापतिपदाच्या निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकमेव पंचायत समिती सदस्याने पक्षाचा आदेश झुगारून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि पदरात उपसभापतिपद पाडून घेतले, त्यामुळे ठाकरे सेनेच्या युवा कार्यकर्त्याने जोरदार राडा केला. पोलिसांनी त्यांना पंचायत समितीच्या आवारातून निघून जाण्यास भाग पाडले. आमदार शरद सोनवणे यांच्या खेळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अतुल बेनके यांचे पंचायत समितीतील सत्तेचे स्वप्न भंगले.

दरम्यान, जुन्नर पंचायत समितीच्या (Junnar Panchayat Samiti) सभापतिपदी शिवसेनेच्या कमल बाळासाहेब शेळकंदे यांची, तर उपसभापतिपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अमित अनंता ढोले यांची निवड झाली. या निवडीमुळे आमदार शरद सोनवणे यांनी पंचायत समितीची सत्ता शिवसेनेकडे ठेवण्यात यश मिळविले आहे.

जुन्नर पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आघाडी झाली होती. या आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने सावरगाव गट आणि त्यातील दोन जागा शिवसेना उबाठाला सोडल्या होत्या. सावरगावतून गणातून उबाठाचे अमित ढोले हे निवडून आले होते. त्यामुळे ढोले हे राष्ट्रवादीसोबत राहतील, असे वाटत असतानाच त्यांनी अचानक पलटी मारली आणि शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

एकूण सोळा सदस्य संख्या असलेल्या जुन्नर पंचायत समितीमध्ये शिवसेनेचे (Shivsena शिंदे गट) आठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, तर शिवसेना (उबाठा) व भाजप यांचे प्रत्येकी एक सदस्य विजयी झाले होते. कोणत्याही एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे सभापती-उपसभाती कोणत्या पक्षाचा होणार, याकडे संपूर्ण जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले होते.

सभापतिपद हे अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी राखीव होते. या प्रवर्गाच्या शिवसेनेचे एक, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन सदस्य निवडून आले होते. सदस्य संख्या विचारात घेता आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सभापती होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती.

Junnar Sabhapati Election
Rajya Sabha Election Secret : ...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना पाठिंबा दिला; शिंदेंच्या निकटवर्तीय खासदाराचा गौप्यस्फोट

दुसरीकडे, माजी आमदार अतुल बेनके यांच्याकडून राजकीय खेळी करत राष्ट्रवादीच्या पारड्यात सभापतिपद पाडले जाईल, असे सांगितले जात होते. त्यामुळे भाजपचे एकमेव सदस्य असलेले संजय वऱ्हाडी यांना उपसभापतिपदाची ऑफर देऊन आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षाकडून केला जात होता.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्कप्रमपुख सचिन अहिर यांनी या निवडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्याही परिस्थितीत शिंदेसेनेसोबत जाणार नसल्याचे सूतोवाच केले होते. मात्र, अमित ढोले यांनी वरिष्ठांचा आदेश झुगारून लावत शिंदेसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ढोले यांच्या निर्णयामुळे शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. युवा नेते विकी पारखे यांची पोलिसांनी समजूत काढत त्यांना पंचायत समितीच्या आवारातून निघून जाण्यास भाग पाडले.

शिवसेनेचे सर्व सदस्य आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली एकत्रितरित्या पंचायत समितीत सकाळी अकरा वाजता आले. तालुकाप्रमुख योगेश पाटे, माऊली खंडागळे, प्रसन्ना डोके, सचिन वाळुंज यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी सभापतिपदासाठी शिवसेनेकडून कमल बाळासाहेब शेळकंदे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशा कैलास डावखर यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला.

या वेळी हात वर करून मतदानाची प्रक्रिया पार पडली. शेळकंदे यांना नऊ, तर डावखर यांना सात मते पडली. उपसभापतिपदासाठी शिवसेनेकडून अमित ढोले, तर राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपकडून संजय वऱ्हाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडीत ढोले यांना नऊ तर वऱ्हाडी यांना सात मते मिळाली. ढोले यांची निवड यावेळी जाहीर करण्यात आली.

Junnar Sabhapati Election
Daund Sabhapati : राष्ट्रवादीची सत्ता उलथवून दौंडच्या इतिहासात प्रथमच भाजपचा सभापती; राहुल कुल गटाची सरशी

जनतेच्या सेवेसाठी सभापतिपदाचा उपयोग करणार : शेळकंदे

जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सभापतिपदाचा उपयोग करणार आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाच्या योजनांची परिणामकारकपणे अंमलबजावणी केली जाईल. प्रत्येक गावातील शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी प्राधान्याने काम केले जाईल, असे जुन्नरच्या नवनिर्वाचित सभापती कमल शेळकंदे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com