Vijay Auti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

विजय औटी म्हणाले, मला कोणतीच निवडणूक लढावयाची नाही

शिवसेनेचे नेते विजय औटी ( Vijay Auti ) यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका करत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाचे सुतोवाच केले.

सनी सोनावळे

टाकळी ढोकेश्वर ( जि. अहमदनगर ) - पाडळीतर्फे कान्हुर (ता.पारनेर) येथे माजी सभापती काशिनाथ दाते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद अंतर्गत मंजूर झालेल्या 85 लाख 50 हजार रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी बोलताना विजय औटी ( Vijay Auti ) यांनी नाव न घेता आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्यावर टीका करत आगामी निवडणुकांबाबत महत्त्वाचे सुतोवाच केले. ( Vijay Auti said, I do not want to contest any election )

विजय औटी म्हणाले, "स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक लढवली नाही. सार्वजनिक जीवनात काम करत असताना आपल्या कामात सातत्य असले पाहिजे, समाजाला प्रबोधन करणे, मार्गदर्शन करणे, समाज चुकीच्या दिशेने चालला असेल तर त्यांना समजावून सांगणे हेच पुढारपण करणार्‍यांचे काम आहे. मला कोणतीच निवडणूक लढावयाची नाही मात्र तालुक्याची घडी बिघडू नका," असे सुचक विजय औटी यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, "एकच माणूस सतत निवडून येत नाही. हेच लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. समाज जीवनात काम करताना ज्या समाजात आपण राहतो त्याचे काही देणे आहे, असे काम आपण केले पाहिजे. समाजासाठी काम करण्याचा भाग म्हणजे निवडणूक असते. यामध्ये हार-जीत होतच असते. निवडणूक जिंकली पाहिजे हा अट्टहास काहीच कामाचा नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

"एका बाजूला सेनापती बापटांचा तालुका, शिक्षकांची पंढरी असणारा तालुका, आपण अभिमानाने सांगतो आम्ही सर्वात जास्त शिक्षक महाराष्ट्रला दिलेत. ही पुण्याई आपण महाराष्ट्राला सांगतो. आपण तरुण पिढीला चांगले विचार आचार दिले पाहिजे. ज्या गोष्टी चुकीच्या घडल्या त्याचे आत्मपरीक्षण करण्यास तुम्ही समर्थ आहात. आज तालुक्यात प्रचंड अस्वस्थता आहे. मुलांना शिक्षणासाठी शाळा निर्माण केल्या, शेतकऱ्यांचा प्रपंच सुखी व्हावा म्हणून बंधारे बांधले, पाऊस पडल्यानंतर शेतीला याचा उपयोग होईल, चांगले उत्पन्न झाल्यानंतर बाजारात नेता यावा म्हणून चांगले रस्ते बनवले, आपण सारे जण मिळून महाराष्ट्राचे सुसंस्कृत विकासाचे भागीदार व्हावे, म्हणून लोकप्रतिनिधी चांगला असावा लागतो," असे सूचक वक्यव्य त्यांनी केले.

"महाराष्ट्र संतांची भूमी आहे. अध्यात्म तुम्हाला सांगते की, शांततेने जागा. शांततामय जीवन जगायचे असल्यास समृद्ध समाज तयार करा. समृद्ध समाज तयार करायचा असेल तर विचारावर आधारित समाजकारण राजकारण करा. गुंडगिरीला थारा देऊ नका. बिघडलेली सामाजिक व्यवस्था दुरुस्त करण्याची जबाबदारी युवकांनी घेतली तर मी तुमच्यापुढे चार पाऊल राहील. जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे आता असे आहे. लग्नाला नाही आला, तर जागरणाला येईल, नाही जमलं तर सत्यनारायणाला येईल, नाहीतर बर्थडे आहेच, हीच आपली जबाबदारी असेल तर आपण पुढे कसे जाणार याचाही विचार केला पाहिजे," अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

"सरकार बदलले की निर्णय बदलतात. पाडळीचे सरपंच लोकनियुक्त आहेत अविश्वास येण्याची भीती नसते हा सर्वात मोठा फायदा होता. आपली खुर्ची शाबूत आहे, याची जाणीव असली की चांगले काम करता येते आणि हरीश काकांनी चांगले काम करून दाखवले आहे. विकास कधीही न संपणारी प्रक्रिया आहे. माझ्या कार्यकाळात मी असंख्य बंधारे बांधले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत प्रचंड रस्त्यांची कामे केली," असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला काशिनाथ दाते, उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, तालुका प्रमुख विकास रोहोकले, बाबासाहेब तांबे, उपतालुका प्रमुख तुषार बांगर, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, गंगाधर रोहोकले, काळकुपचे उपसरपंच विलास सालके, प्रकाश कोरडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT