Vijaykumar Deshmukh-Ram Satpute Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : सातपुतेंना सोलापूर शहर उत्तरमधून किती लीड मिळणार?; देशमुखांच्या आकड्याने भाजप नेत्यांची धाकधूक वाढणार...

Lok Sabha Election 2024 : माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या दाव्याने भाजप नेत्यांना हायसे वाटण्याऐवजी धाकधूक वाढवली आहे. कारण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य तब्बल 23 हजार 667 कमी आहे, त्यामुळे सर्वाधिक भरवशाचा शहर उत्तर प्रत्यक्षात किती लीड देणार, याकडे भाजप आणि सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 June : सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढाई झाली असून आता सर्वांचे लक्ष चार जूनच्या मतमोजणीकडे लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे सोलापूर शहराचे कारभारी, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार राम सातपुते यांना किमान 40 हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा केला आहे. मात्र, त्यांच्या या दाव्याने भाजप नेत्यांना हायसे वाटण्याऐवजी धाकधूक वाढवली आहे. कारण गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मताधिक्य तब्बल 23 हजार 667 कमी आहे, त्यामुळे सर्वाधिक भरवशाचा शहर उत्तर प्रत्यक्षात किती लीड देणार, याकडे भाजप आणि सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर 2024 मध्ये हॅट्‌ट्रीक करण्याचा इरादा भाजप नेतृत्वाचा आहे. त्यासाठी सोलापूरमधून तरुण आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात निवडणुकीत उतरविले. त्यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापर्यंत भाजपचे झाडून सर्व नेत्यांनी सोलापूरच्या मैदानात हजेरी लावली. नरेंद्र मोदी यांच्या कामाच्या जोरावर सोलापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा आपल्याला विजय मिळेल, असा आशावाद भाजपला आहे. मात्र, गेल्या दोन निवडणुकीच्या तुलनेत 2024 ची निवडणूक ही भाजपासाठी कठीणच होती, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत, त्यामुळे आमदार राम सातपुते यांचे पारडे कागदावर तरी जड वाटते. मात्र, वास्तव परिस्थिती याहून वेगळी आहे. मोहोळ आणि पंढरपूर विधानसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपला फटका बसण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे. तसेच, मागील दोन खासदारांची निष्क्रियतेचा मुद्दाही आमदार प्रणिती शिंदे यांनी लावून धरला होता.

राम सातपुते यांच्या विजयाची भिस्त ही प्रामुख्याने माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख (Vijaykumar Deshmukh) यांचा सोलापूर शहर उत्तर मतदार संघ, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या दक्षिण सोलापूर मतदारसंघातील शहरी भाग आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या मोहोळ मतदारसंघातील मताधिक्यावर अवलंबून आहे. मात्र मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या वर्षी किमान 40 हजारांचे लीड मिळेल, असा अंदाज माजी मंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वतःच वर्तविला आहे. देशमुख यांच्या विधानामुळे भाजपची धाकधूक वाढण्याची चिन्हे आहेत.

वास्तविक, सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ हा भाजपचा सर्वाधिक सुरक्षित आणि सर्वाधिक मताधिक्य देणारा मतदारसंघ मानला जातो. मागील निवडणुकीत शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांना 99 हजार 260 मते मिळाली होती. काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना 35 हजार 593 मते मिळाली, तर वंचितचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांना 26 हजार 870 मते मिळाली होती. म्हणजेच भाजप उमेदवार महास्वामी यांना 63 हजार 667 मताधिक्य देशमुख यांनी दिले होते.

या निवडणुकीत शहर उत्तरमधून किमान 40,000 चे मताधिक्य मिळेल, असा हवाला विजयकुमार देशमुख यांनी दिला आहे. हा आकडा जरी मोठा वाटत असला तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत 23 हजार 668 ने कमीच आहे, त्यामुळे देशमुख यांच्या हवाल्यामुळे निकालाच्या अगोदर तीन दिवस भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धाकधूक वाढवली आहे. तसेच, शहर उत्तर वगळता इतर ठिकाणी किती मताधिक्य मिळेल अथवा काय परिस्थिती असेल, हे मी सांगू शकत नाही. त्याबाबत मला माहिती नाही, असे पालकमंत्री राहिलेल्या विजयकुमार देशमुख यांनी म्हटल्यामुळे भाजपच्या निवडणुकीतील सामूहीक कामांवर प्रश्नचिन्ह उभारणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT