Vijayshinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vijaysinh Mohite Patil : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही विजयदादांना मानाचे पान...

Assembly Election 2024 : मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले होते. भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून मात्र बाजूला गेले होते. तसेच, विजयदादा आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र...

Vijaykumar Dudhale

Solapur, 19 October : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा मानाचे पद देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये (पार्लमेंटरी बोर्ड) स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपमध्ये अडगळीत पडलेल्या मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीत आल्यानंतर पक्षात पुन्हा सन्मान देण्याचे काम पवारांकडून झाले आहे.

मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील हे भाजपमध्ये गेले होते. भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून मात्र बाजूला गेले होते. तसेच, विजयदादा आणि शरद पवार यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र, गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानंतर पवार हे थेट अकलूजला शिवरत्न बंगल्यावर विजयदादांची (Vijayshinh Mohite Patil) विचारपूस करायला पोचले आणि पवार-मोहिते पाटील यांच्यातील ऋणानुबंध पुन्हा जुळण्यास सुरुवात झाली.

मोठा गाजावाजा करत भाजपमध्ये गेलेल्या मोहिते पाटील यांच्या हाती केवळ रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून विधान परिषद लागली होती. मात्र, त्यासाठीही बरीच वाट पाहावी लागली होती. त्याच वेळी मोहिते पाटील यांची भाजपमध्ये (BJP) कोंडी होत होती. भाजपच्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी मोहिते पाटील हे संधीची वाट पाहत होते. दुसरीकडे, पवारांनाही जुन्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याची आस राष्ट्रवादीच्या फुटीनंतर लागली होती, त्यामुळे त्या भेटीनंतर मोहिते पाटील आणि पवार यांच्यातील संबंध अधिक सुरळीत होत गेले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच विजयसिंह मोहिते पाटील यांना उपमुख्यमंत्रिपदापर्यंत काम करण्याची संधी मिळाली होती. तसेच, रणजितसिंह मोहिते पाटील यांना राज्यसभेवरही घेण्यात आले होते. मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही शरद पवारांनी सोपवली होती, त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी देत लोकसभेवरही संधी देण्यात आली होती. त्यामुळे पवार आणि मोहिते पाटील यांच्यातील ऋणानुबंध जुने आहेत.

भाजपमध्ये होणाऱ्या कोंडीला मोहिते पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बंडखोरी करत वाट मोकळी करून दिली होती. त्या बंडखोरीला शरद पवारांचा पाठिंबा होता. अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावर विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यातील बैठकीनंतर सोलापूर आणि माढ्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे वारेही बदलण्यास सुरुवात झाली.

शरद पवार यांनी मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये स्थान देत पुन्हा एकदा मानाचे स्थान दिले आहे. आजच्या संसदीय मंडळाच्या बैठकीचे निमंत्रणही त्यांना देण्यात आलेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा आलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांना पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे मानसन्मान देण्याचा निर्णय पवारांनी घेतल्याचे दिसून येते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT