Gopichand Padalkar Vs Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gopichand Padalkar Vs Ajit Pawar : पडळकरांचा सुपडासाफ करण्यासाठी अजितदादांना सापडला मोहरा; मायक्रो प्लॅनिंग सुरू

Gopichand Padalkar : विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने जतचे माजी आमदार विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकालपट्टी झाली होती.

Hrishikesh Nalagune

जतचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे राज्याच्या राजकारणात चर्चेत आले तेच मुळात पवार कुटुंबियांवर टीका करून. मागच्या सहा ते सात वर्षांपासून संधी मिळेल तिथे ते ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करायचे. कधी कधी तर ही भाषा अत्यंत खालच्या स्तरावरची असायची.

आजही पडळकर यांचा टीकेचा सूर नरमला असला तरी टीकेच्या केंद्रस्थानी शरद पवार किंवा अजित पवार हमखास असतातच. 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून बारामती विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. या सगळ्या टीकांवर, "त्याचं डिपाझिट जप्त झालं आहे. त्याला का मोठं करता", असं म्हणत अजित पवार मात्र फारसे कधी उत्तर द्यायचे नाही.

पण आता अजित पवार यांनी अत्यंत शांतपणे पडळकर यांच्याविरोधात फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने जतचे माजी आमदार विलास जगताप आणि तमनगौडा रवी पाटील या दोघांचीही भाजपमधून हकालपट्टी झाली होती. पडळकर यांच्या याच कट्टर विरोधकांना अजित पवार ताकद देणार आहेत.

विलास जगताप यांच्यासह तमनगौडा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या दोघांच्याही पक्षप्रवेशामुळे जत तालुक्यातील राजकीय समीकरण बदलणार आहेत. पडळकर यांचे उपद्रव मूल्य बघता मुख्यमंत्री फडणवीस त्यांना बाजूला करतील ही शक्यता कमी आहे. पण अजित पवार यांनाही पडळकर यांच्याबद्दल निश्चित राग आहे. त्यातूनच ते पडळकर विरोधी गटाला मजबूत करत आहेत.

विलास जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद काय आहे?

जतमधील लक्षणीय धनगर समाजामुळे गोपीचंद पडळकर यांना इथे जनाधार मिळाला. राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप, वंचित बहुजन आघाडी आणि भाजप अशा विविध पक्षांच्या माध्यमातून राजकारण करत ते जतमध्ये स्थिरावले. 2019 मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून सांगली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली.

पडखळकरांच्या उमेदवारीची भाजपच्या संजयकाका पाटील यांना उघड मदत झाली होती. त्यामुळे संजयकाका पाटील यांनीही पडळकर यांना पुरक भूमिका घेण्यास सुरूवात केली. इथेच विलास जगताप अस्वस्थ व्हायला सुरुवात झाली. त्यावेळी पडळकर यांनी बारामतीमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचे लक्ष जत मतदारसंघात लागले होते.

पडद्यामागे घडामोडी घडल्या आणि 2019 मध्ये विलास जगताप यांचा पराभव झाला. काँग्रेसचे विक्रम सावंत आमदार झाले. जगताप यांच्या ताकदीला खो बसला. हाच संघर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बघायला मिळाला. जगताप यांनी संजयकाका भूमिका घेतली. त्यांनी थेट अपक्ष विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.

त्यावेळी पडळकर विधान परिषदेवर आमदार होते. सोबतच संजय काका पाटील पराभूत झाले तर आपल्याला विधानसभेची निवडणूक सोपी जाईल, असा जगताप यांचा होरा होता. संजयकाका पराभूत झाले, पण गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवायची म्हणून शड्डू ठोकला. त्यामुळे जगताप यांची अडचण झाली.

अशात लोकसभेला घेतलेल्या भूमिकेमुळे उमेदवारी कापली जाऊ शकते हे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तमनगौडा रवी पाटील यांना घोड्यावर बसवले. त्यांनी भूमिपुत्र विरुद्ध बाहेरचे असे म्हणत पडळकरांविरोधात मोहीमच सुरू केली. पडळकर हे भुमिपूत्र नाहीत त्यामुळे त्यांना उमेदवारी नको असे त्यांचे म्हणणे होते.

पाटील आणि जगताप यांनी मुंबईत धडक देत पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला. पण पक्षाने पडळकर यांन तिकीट जाहीर केले. त्यामुळे चिडून पाटील यांनी बंडखोरी केलीच. त्यांची बंडखोरी रोखण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील जतमध्ये गेले. पण बंडखोरी थांबली नाही. त्यांच्या उमेदवारीला विलास जगताप यांचेही पाठबळ मिळाले.

यानंतर देखील पडळकर जवळपास 38 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. निवडणूक संपताच विलास जगताप आणि तमनगौडा पाटील यांच्यावर कारवाई झाली. आता याच दोघांना अजित पवार राष्ट्रवादीत घेणार आहेत. पडळकर विरोधी गटाला ताकद देण्याची अजित पवार यांनी खेळी खेळलेली दिसून येते.

अजित पवार यांनी अत्यंत शांततेत खेळलेल्या या डावपेचाला आता पडळकर कसे उत्तर देतात, आगामी निवडणुकीत पडळकर विरुद्ध जगताप या वातावरणात कोण बाजी मारणार? अशा गोष्टी बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT