Sadabhau Khot Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sadabhau Khot : आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?; माढ्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहून हात जोडत सदाभाऊंचा काढता पाय

Solapur Flood Update : सोलापूर जिल्ह्यातील पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना ‘आठ दिवस कुठं होता?’ असा सवाल करत घेराव घातला. संताप वाढल्याने खोतांना हात जोडून माघार घ्यावी लागली.

Vijaykumar Dudhale
  1. अतिवृष्टी आणि महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत उंदरगावात गेले असता शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाला सामोरे जावे लागले.

  2. गावकऱ्यांनी "१६ वर्षांनी आलात", "फक्त फोटो काढायला आलात का?" असे प्रश्न विचारून खोतांना घेरले; शेवटी त्यांनी हात जोडून माघार घेतली.

  3. शेतकऱ्यांनी जनावरांच्या चार्‍याची, मदतीची मागणी केली आणि २००९ च्या निवडणुकीत दिलेली वर्गणीही परत द्या असे आक्रमकपणे सुनावले.

Solapur, 27 September : अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांसह शेती वाहून गेली असून घरात पुरामुळे सर्वत्र चिखल झाला आहे, त्यामुळे बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले माजी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ‘आठ दिवस कुठं होता?, आम्ही वर्गणी काढून सदाभाऊंना 2009 च्या निवडणुकीत लीड दिला ते आमच्याकडं 16 वर्षांनी आलेत,’ असे म्हणून शेतकऱ्यांनी खोतांना घेरले. शेतकऱ्यांचा संताप पाहून अखेर सदाभाऊंनी खोतांनी हात जोडून काढता पाय घेतला.

आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) हे आज माढा तालुक्यातील उंदरगाव येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले होते. उंदरगाव हे माढा लोकसभा मतदारसंघातील गाव असून या गावाने लोकसभेच्या 2009 च्या निवडणुकीत वर्गणी काढून सदाभाऊ खोत यांना मदत केली होती. तसेच गावातून मताधिक्क्यही दिले होते. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनंतर सदाभाऊ खोत हे उंदरगावात आले होते, त्यामुळे खोतांवर ग्रामस्थांचा राग होता.

माढा (Madha) तालुक्यातील उंदरगावात आलेल्या सदाभाऊ खोत यांना आठ दिवस कुठं होता. नुसते फोटो काढायला आलात का, असा प्रश्नांचा भडिमार त्यांच्यावर करण्यात आला. रस्त्यावरून पाहणी करणाऱ्या सदाभाऊंना शेतकरी आमच्या घराकडे चला असं म्हणत होते. तुम्ही नुसतंच रस्त्यावर उभे राहून पाहणी करून काय उपयोग? असेही शेतकरी म्हणत होते. मात्र, ग्रामस्थांचा रोष पाहून सदाभाऊ खोत यांनी अक्षरशः हात जोडले आणि काढता पाय घेतला.

एका ज्येष्ठ शेतकऱ्याने ‘सदाभाऊ आमच्यावर उपकार करा’ अशी हात जोडून विनंती केली. आम्ही निवडणुकीत दिलेले पैसे तरी आम्हाला माघारी द्या, असे शेतकरी आक्रमकपणे बोलत होते. हे सर्व सदाभाऊ खोत हताशपणे पाहत होते. अनेक शेतकरी जनावरांच्या वैरणीची सोय करावी, अशी विनंती करत होते. हात जोडलेले ज्येष्ठ शेतकरी म्हणाले, आमच्यासाठी मदत न आणणाऱ्या सदाभाऊंनी माघारी जावं. आमचं नशिबानं काही होईल ते होईल.

प्रहार संघटनेने आमच्यासाठी काहीच केलेले नाही. आमच्यासाठी त्यांनी काहीच केलं नाही. सदाभाऊ खोत यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी ह्या पठ्ठ्याने पाच हजार रुपये दिले होते. आमची काहीच मागणी नाही, त्यांनी माघारी जावं. आम्हाला त्यांचं काहीच नको आहे. ते सोळा वर्षांनी आले आहेत.आमच्या नशिबाने काय होईल ते तुम्ही आमच्याकडे येऊही नका आणि काही देऊ नका, असे सुनावले.

आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही वादविवाद करून काय उपयोग होणार आहे. तुम्ही म्हणाला माघारी जावा,जर जातो माघारी असे सदाभाऊ खोत म्हणाले. त्यावर शेतकरी म्हणाले, तुम्ही लोकसभा निवडणुकीला उभे होता, त्या वेळी २५ हजारांची वर्गणी देऊन पाचशे पाचशेच्या माळा घातल्या. या गावानं तुमच्यावर प्रेम दिलं, तुम्हाला लीड दिलं. त्यानंतर तुम्ही आमच्याकडं आताच आला आहात, असेही शेतकऱ्यांनी सुनावलं.

आमची जनावरं रस्त्यावर बांधली आहेत. आम्ही कसं तरी माणसं वाचवली. आमच्या घरातील लोकांना पाहुण्या-रावळ्यांकडे पाठवलं. आम्ही गेली तीन दिवसांपासून कलेक्टरपासून बीडीओपर्यंत सर्वांशी बोलतोय. पण, जनावरांना चारा मिळत नाही. खासदारांनी थोडाफार चारा दिला आहे. गावांत फवारणी नाही, सगळेजण टोलवाटोलवी करत आहेत, असेही शेतकऱ्यांनी सदाभाऊ खोत यांना ऐकवले.

  1. प्र: सदाभाऊ खोत कोणत्या गावाला भेट देण्यासाठी आले होते?
    उ: माढा तालुक्यातील उंदरगाव.

  2. प्र: गावकऱ्यांचा मुख्य आक्षेप काय होता?
    उ: १६ वर्षांनंतर गावात येऊन फक्त औपचारिक पाहणी केली.

  3. प्र: शेतकऱ्यांनी कोणती मागणी केली?
    उ: जनावरांसाठी चारा आणि तातडीची मदत.

  4. प्र: शेतकऱ्यांनी खोतांना काय सुनावले?
    उ: निवडणुकीत घेतलेली वर्गणी परत द्या आणि आमच्यासाठी काही केले नाही म्हणून परत जा.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT