Mauli Palkhi In satara
Mauli Palkhi In satara sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

लोणंदनगरीत विसावला वैष्णवांचा मेळा.. माऊलींच्या पालखीचे साताऱ्यात आगमन

रमेश धायगुडे

लोणंद : निरभ्र आकाशात विहरणारे ढग अन् भगव्या पताका, टाळ-मृदंगांचा अखंड निनाद आणि हजारो वारकरी करत असलेल्या अव्याहत ‘माउली, माउली’च्या जयघोषात आज संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले, अन् अवघी लोणंदनगरी माउलीमय होऊन गेली. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत करण्यात आले.

यावेळी साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटण प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांच्यासह मान्यवर व वरिष्ठ अधिकारी यांनी उपस्थित होते.

माउलींचा पालखी सोहळा हा सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. वारकरी सांप्रदायासह सर्वजण वारी सोहळ्याची वाट पाहतात. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे गेली दोन वर्षे हा वारी सोहळा होऊ शकला नाही. त्यामुळे सर्वांनाच वारीची आस लागली होती. माउलींच्या पादुकांच्या दर्शनाची आस लागली होती. त्यामुळे आज लोणंदनगरी भाविकांच्या गर्दीने तुडुंब भरली होती. काल रात्री वाल्ह्यात पालख्यांचा विसावा होता.

लोणंदमध्ये आज पालख्या येणार असल्याने जिल्ह्याशिवाय कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली आदींसह विविध जिल्ह्यांतील भाविक आणि छोट्या दिंड्या लोणंदमध्ये दाखल झाल्या होत्या. राज्याच्या पश्‍चिम भागातील भाविक पालख्या व पादुकांच्या दर्शनासाठी लोणंदमध्ये येतात. त्यामुळे कालपासूनच लोणंद व परिसर वारकऱ्यांच्या गर्दीने भरला होता. त्यातच माउलींचा मुख्य रथ आज येणार असल्याने सुमारे पन्नास टक्के वारकरी दिंड्या रात्रीपासूनच लोणंदमध्ये दाखल झाल्या होत्‍या. त्यामुळे सर्वत्र वारकऱ्यांचे तंबू दिसत होते.

नीरा नदीच्या पुलावर पालख्यांच्या आगमनाचा आणि पादुकांना नीरेत स्नान घालण्याचा सोहळा पाहण्यासाठी नागरिक सकाळी दहापासूनच जागा धरून होते. वारकरी खांद्यावर भगवी पताका घेऊन माउली, माउलीचा घोष करत वाट चालत होते. त्यात सर्व वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय होती. अगदी उच्चशिक्षित महिलाही वारीत सहभागी झाल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चाललेल्या महिला देहभान हरपून माउलींच्या घोषात दंग होत्या. अनेक बाल वारकरीही थाटात दिंडीत सहभागी झाले होते.

नीरेच्या पुलावर आणि रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी गर्दी केली होती. पालखी मार्गावर पोलिस कर्मचारी वाहतूक कोंडी व गर्दीवर नियंत्रण ठेवत होते. दुपारी बाराच्या सुमारास नीरेतून पालख्यांचा मुक्काम हलला आणि मानाच्या दिंड्या लोणंदकडे मार्गस्थ होऊ लागल्या. त्यावेळी वारकऱ्यांनी खांद्यावर घेतलेल्या भगव्या पताका अन् टाळ-मृदंगाच्या घोषाने वातावरण विठ्ठलमय झाले. पालख्या पुलावर येताच वारकरी, भाविकांनी ज्ञानेश्‍वर माउलींच्या नामाचा गजर केला.

भारावलेल्या वातावरणात माउलींच्या रथातून नीरा स्नानासाठी पादुका घेऊन जाताना पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. नीरेत पादुकांना स्नान घालताना भाविकांनी अव्याहत घोष सुरू ठेवला होता. स्नानानंतर गर्दीतून वाट काढत पादुका पुन्हा रथात ठेवण्यात आल्या. यावेळी पादुकांना स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी वारकरी, भाविकांची धडपड सुरू होती. पादुका रथात ठेवताच ज्ञानेश्‍वर माउलींच्या घोषाने सारा आसमंत दुमदूमन गेला.

राज्यात चांगला पाऊस पडू देत...

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, पालखी सोहळ्यामध्ये उत्साह दिसत असून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन झाले आहे. जिल्ह्यात सहा दिवसांचा मुक्काम असून वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधांसह इतर सुविधाही प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. राज्यात चांगला पाऊस पडू देत व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात उष:काल यावा, अशी प्रार्थना त्यांनी माऊलीच्या चरणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT