sambhaji raje chhatrapati Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sambhaji Chhatrapati : 'विशाळगड दंगलीला एकवर्ष; मला खलनायक ठरवून एकटं....', संभाजीराजेंनी खंत बोलून दाखवली

Vishalgad Riots Sambhaji Chhatrapati : अनेकांनी आमच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून आमच्यावर शितोडे उडविण्याचे प्रयत्न केले. पण श्री शिवरायांचा आशीर्वाद व शिवभक्तांची साथ आम्हाला अधिक बळ देत होती, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Rahul Gadkar

Sambhaji Chhatrapati News : गेल्यावर्षी 14 जुलै 2024 रोजी याच दिवशी किल्ले विशाळगडच्या अतिक्रमणासंदर्भात मोठी दंगल झाली. या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी टीकाकारांना थेट लक्ष्य केले आहे. या मोहिमेला अनेकांनी जाणीवपूर्वक वेगळे वळण दिले. नको ते रंग देऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला व या मोहिमेत सहभागी असलेल्या शिवभक्तांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. काही राजकीय मंडळींनी आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. अशी खंत समाज माध्यमांवरून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे.

'अनेकांनी आमच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून आमच्यावर शितोडे उडविण्याचे प्रयत्न केले. पण श्री शिवरायांचा आशीर्वाद व शिवभक्तांची साथ आम्हाला अधिक बळ देत होती. श्री शिवरायांचा वारस व निस्सीम शिवभक्त असण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. ज्या गड़ाने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणरक्षण केले त्या गडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न कामी आले याचे समाधान सदैवच असेल', असा विश्वास संभाजी छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.

संभाजीराजेंची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

विशाळगड मुक्ती मोहिमेची वर्षपूर्ती…

विशाळगड ! नावाप्रमाणेच ‘विशाल’ असणारा हा गड, हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आणि तेजस्वी ठसा उमटवणारा आहे. एखाद्या शिवभक्ताला या गडाचा इतिहास व ऐतिहासिक महत्त्व चांगलेच माहिती असते.

मात्र, गेल्या काही दशकांत गडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. अनधिकृत बांधकाम, धर्मांधता, अस्वच्छता, पार्ट्या, अवैध धंदे, दुर्गंधीचे साम्राज्य आणि कचऱ्याचे ढिग यांमुळे गडाचे गडपण हरवले होते. राज्य पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात असलेल्या विशाळगडाकडे कित्येक वर्षे अक्षम्य दुर्लक्ष झाले होते. विशाळगडाची मूळ ऐतिहासिक ओळख बाजूला पडून चुकीची ओळख निर्माण होत होती. ही खंत माझ्यासारख्या हजारो शिवभक्तांच्या मनाला सलत होती.

गडाच्या संवर्धनासाठी २०१७ साली मी पाच कोटी रुपयांचा निधी आणला होता. त्याबरोबरच, गडावर आणि पायथ्याला झालेली बेसुमार अतिक्रमणे शासनाने त्वरित हटवावीत, यासाठीदेखील मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. याकरिता ०५ डिसेंबर २०२२ रोजी मी स्वतः असंख्य शिवभक्तांसह विशाळगडावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती व याबाबत ०७ डिसेंबर २०२२ रोजी कोल्हापूर येथे जिल्हा प्रशासनाची बैठक बोलाविली होती. याच बैठकीत गडावर पशुहत्याबंदीचा आदेश तात्काळ लागू करण्यात आला. तसेच पुढील तीन महिन्यांत विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याची ग्वाही प्रशासनाने दिली. दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने प्रत्यक्ष मोहीम सुरू देखील केली मात्र लगेचच ती बंद पाडण्यात आली. ती का, कुणी व कशी बंद पाडली, यावर मी ज्या-त्या वेळी बोललोच आहे !

परिणामी, नंतरच्या वर्षभरात गडावर धर्मांधता व अतिक्रमणे परत जोर धरू लागली. शिवभक्तांचा रोष वाढतच गेला. त्यामुळे विशाळगड मुक्ती मोहीम हाती घेतली. १४ जुलै २०२४ रोजी सर्व शिवभक्तांना विशाळगडावर येण्याचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत हजारो शिवभक्त गडपायथ्याला पोहोचले. अतिक्रमण हटविल्याशिवाय गड सोडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. शिवभक्तांचा रोष पाहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच गडावरील अतिक्रमणे हटविण्याचा आदेश प्रशासनास दिला. आज या मोहिमेस एक वर्ष पूर्ण झाले.

या मोहिमेमुळे दुसऱ्या दिवशीपासून गडावरील अतिक्रमणे हटविण्याच्या कामास सुरुवात झाली. प्रशासकीय व कायदेशीर अडचणींवर मात करत वर्षभरात गडावरील ९०% हून अधिक अतिक्रमणे हटविली गेली आहेत. गडावरील पशूहत्या, अवैध धंदे पूर्णपणे बंद झाले आहेत. या मोहिमेचे हे मोठे यश आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेली उर्वरीत अतिक्रमणे देखील लवकरच हटवून विशाळगडाला पूर्णत: मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

या मोहिमेला अनेकांनी जाणीवपूर्वक वेगळे वळण दिले ! नको ते रंग देऊन राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला व या मोहिमेत सहभागी असलेल्या शिवभक्तांना खलनायक ठरविण्याचा प्रयत्न केला. काही राजकीय मंडळींनी आम्हाला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी आमच्या बाबतीत गैरसमज निर्माण करून आमच्यावर शिंतोडे उडविण्याचे प्रयत्न केले. पण श्री शिवरायांचा आशीर्वाद व शिवभक्तांची साथ आम्हाला अधिक बळ देत होती. श्री शिवरायांचा वारस व निस्सीम शिवभक्त असण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आणि ज्या गडाने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राणरक्षण केले त्या गडाला अतिक्रमणाच्या विळख्यातून सोडवण्यासाठी केलेले प्रयत्न कामी आले याचे समाधान सदैवच असेल…

जय भवानी, जय शिवराय !

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT