Assembly Election 2024: नाशिक शहरातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार वादविवादांमुळे चर्चेत आहे. भारतीय जनता पक्षाकडून आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या प्रचारातही अडथळे आणले जातात, असे आरोप होत आहेत. भाजपने देखील विरोधकांकडून गैरप्रकार केले जातात, असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे आता त्यात पक्षाचे वरीष्ठ सहभागी होऊ लागले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे शुक्रवारी नाशिक पश्चिम मतदार संघातील उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. आमदार मुंडे प्रचाराला आल्या असतानाच या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या मतदान चिठ्ठ्या वाटप करताना जोरदार वादविवाद झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना विरोध केल्याने चांगलाच वाद झाला. हा वाद हात घाईवर आला. त्यात शिवसेनेचा एक कार्यकर्ता जखमी झाला.
हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. यावेळी महाविकास आघाडी आणि भाजप दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमले होते. शिवसेनेकडून पोलीस निष्पक्ष काम करीत नसल्याचा आरोप होत होता. याचवेळी आमदार मुंडे यादेखील थेट पोलीस ठाण्यात पोहोचल्या. स्थानिक प्रचाराच्या वादात राज्यस्तरीय नेत्याने लक्ष घातल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
आमदार मुंडे यांच्या या पुढाकाराची तुलना ओघानेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी झाली. गुरुवारी खासदार सुळे नाशिकच्या प्रचार दौऱ्यावर होत्या. त्या नाशिक पूर्व मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गीते यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी उमेदवार गणेश गीते यांच्या भावाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात अडथळा आणून धक्काबुक्की केल्याचे प्रकरण घडले.
श्री. गीते यांच्या गाडीवर दगडफेकही झाली. या प्रकरणाची दखल घेत खासदार सुळे यांनी प्रचार सभेला न जाता थेट पोलीस आयुक्तालय गाठले होते. त्यांच्या मागोमाग पक्षाचे शेकडो समर्थक काही पोलीस आयुक्तालयात जमले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी सुळे यांनी हे पाऊल उचलले होते. दुसऱ्याच दिवशी आमदार मुंडे यांनीही त्याचे अनुकरण केल्याने तो चर्चेचा विषय ठरला. खासदार सुळे यांच्या कार्यपद्धतीचे अनुकरण म्हणून तर आमदार मुंडे थेट अंबडच्या पोलीस ठाण्यात गेल्या नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही आघाड्यांवर अतिशय टोकाचे आरोप प्रत्यारोप आणि वाद सुरू आहेत. यामध्ये वरिष्ठ नेत्यांनाही ओघानेच सहभागी व्हावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या दडपशाहीचा विरोध म्हणून पोलिसांना थेट इशारा दिला आहे. असेच काहीसे पाहून भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी घेतले. नाशिकच्या राजकारणात त्यामुळेच खासदार सुळे आणि आमदार पंकजा मुंडे या चर्चेचा विषय ठरले आहेत.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.