Bhagirath Bhalke Meet Vijaysinh Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Politic's : पंढरपुरात परिचारकविरोधी आघाडीचा उमेदवार ठरला; भालकेंसाठी अभिजीत पाटलांचे पवारांकडे लॉबिंग!

Nagarpalika Election 2025 : आमदार अभिजीत पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील नेते प्रथमच एकत्र आले असून परिचारक गटाची सत्ता उलथवण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.

Vijaykumar Dudhale

विठ्ठल परिवाराची मोर्चेबांधणी:

पंढरपूर नगरपालिकेवरील परिचारक गटाची सत्ता उलथवण्यासाठी आमदार अभिजीत पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील सर्व नेते एकत्र आले असून त्यांनी एकसंघ उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवार म्हणून प्रणिता भालके पुढे:

भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे आले असून त्यांचा सर्वसामान्यांशी संपर्क आणि जनआधार हा त्यांचा प्लस पॉईंट मानला जात आहे.

शरद पवारांकडे उमेदवारीचा आग्रह:

आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांच्याकडे प्रणिता भालके यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला, तर पवारांचा ग्रीन सिग्नल मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pandharpur, 09 November : पंढरपूर नगरपालिकेवरील अनेक वर्षांची परिचारक गटाची सत्ता उलथवून टाकण्यासाठी विठ्ठल परिवाराने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तसे डावपेचही आखण्यात येत आहेत. पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आमदार अभिजीत पाटील यांच्यासह विठ्ठल परिवारातील सर्वच नेते प्रथमच एकत्र आले असून परिचारक यांच्याकडून नगरपरिषदेची सत्ता हिसकावण्याचा चंग बांधला. विठ्ठल परिवाराचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारही ठरला असून त्यासाठी खुद्द आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांकडे आग्रह धरला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी गेल्या तीन महिन्यांपासून पंढरपूर नगरपालिकेसाठी गोळीबेरीज सुरू केली होती. सर्व विरोधकांनी एकत्र येऊन परिचारक यांच्या विरोधात एकच उमेदवार देण्यात यावा, अशी त्यांची पाहिल्या दिवसांपासूची मागणी होती, त्यासाठी त्यांनी विठ्ठल परिवारातील मात्र विरोधात असलेल्या नेत्यांशी संभाषणाला सुरुवात केली. विठ्ठल परिवारातील नेत्यांनीकडून त्यांना प्रतिसाद मिळत गेला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते दिलीप धोत्रे यांच्या पुढाकारातून विठ्ठल परिवारातील (Vitthal Parivar) सर्वपक्षीय नेत्यांची ‘हॉटेल ग्रॅंड’ मध्ये गेल्या दहा ते बारा दिवसांत दोन बैठका झाला. तसेच, कल्याणराव काळे यांच्या कार्यालयातही या नेत्यांच्या बैठका झाला. या बैठकांमध्ये विठ्ठल परिवारातील नेत्यांचे मनोमिलन झाले. पहिल्या बैठकीला गणेश पाटील आणि कल्याणराव काळे हे उपस्थित नव्हते. मात्र, त्यांनी दुसऱ्या बैठकीला हजेरी लावली आणि परिवारात ऐकीचे वारे वाहू लागले.

दरम्यान, परिचारक यांच्या विरोधात लढण्यासाठी तेवढाच तुल्यबळ उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय विठ्ठल परिवाराने घेतला, त्यातून भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचे नाव पुढे आले. सर्वसामन्यांशी असणारा संपर्क जमेची बाजू आहे. तसेच, भगीरथ भालकेंनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी निमार्ण केलेला झंझावात हा प्रणिता यांच्यासाठी प्लस पॉईंट ठरणार आहे. तसेच, भालके कुटुंबातील व्यक्ती प्रथमच पंढरपूर शहराच्या राजकारणात प्रथमच दिसणार आहे.

भगीरथ भालके यांनी त्यादृष्टीने जुळवाजुळवी करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते. स्थानिक नेत्यांशी बेरजेचे राजकारण करण्याबरोबरच भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकदही पाठीशी राहावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येते. त्यातूनच त्यांनी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट घेतली आहे.

आमदार अभिजीत पाटील यांनीही आज झालेल्या राष्ट्रवादी काँंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीत महाविकास आघाडीकडून प्रणिता भालके यांना उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार मागणी केली. परिचारकांच्या विरोधात भालके यांची उमेदवारी कशी सक्षम आहे, हेही त्यांनी शरद पवारांना पटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. आता पवारांकडून भालकेंच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल मिळतो का, हे पाहावे लागणार आहे.

Q1: पंढरपूरमध्ये कोणत्या गटाविरुद्ध मोर्चेबांधणी सुरू आहे?
A1: परिचारक गटाविरुद्ध विठ्ठल परिवाराने मोर्चेबांधणी केली आहे.

Q2: विठ्ठल परिवाराचा संभाव्य उमेदवार कोण आहे?
A2: भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके यांचे नाव पुढे आले आहे.

Q3: प्रणिता भालके यांची ताकद काय मानली जाते?
A3: सर्वसामान्यांशी असलेला त्यांचा संपर्क आणि भगीरथ भालके यांचा जनाधार ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे.

Q4: अंतिम उमेदवारीवर निर्णय कोण घेणार आहे?
A4: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT