

ज्ञानेश नवले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश:
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विदुरा नवले यांचे पुत्र ॲड. ज्ञानेश नवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ज्यामुळे पिता-पुत्र वेगवेगळ्या पक्षांत गेले आहेत.
राजकीय पार्श्वभूमी:
विदुरा नवले हे शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील घनिष्ठ मित्र असून, त्यांनी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्यांनी पवारांचे निकटचे संबंध राखले, पण नेहमीच कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिले.
स्थानिक परिणाम:
ज्ञानेश नवले यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मुळशी तालुक्यातील सहकार व राजकारणात नवे समीकरण निर्माण झाले असून, आगामी काळात तुकाराम साखर कारखान्यातील नेतृत्वात फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे.
Pune, 09 November : कॉंग्रेसचे माजी खासदार तथा श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा नवले यांचे पुत्र ॲड. ज्ञानेश नवले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. अनेक राजकीय स्थित्यंतरांमध्येही विदुरा नवले हे कॉंग्रेसशीच एकनिष्ठ राहीले. परंतू ॲड. ज्ञानेश नवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पिता कॉंग्रेसमध्ये, तर पुत्र राष्ट्रवादीत अशी स्थिती निर्माण झाली आहे. माजी खासदार नवले हे ज्येष्ठ नेते शरद पवारांचे महाविद्यालयीन जीवनापासूनचे घनिष्ठ मित्र आहेत.
मुळशी तालुका एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. सहकारमहर्षी (कै.) मामासाहेब मोहोळ यांच्या काळात तर संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू मुळशी तालुका होता. माजी खासदार विदूरा नवले (Vidura Navale) आणि अशोक मोहोळ ही नाना आण्णांची जोडी केवळ मुळशीतच नव्हे; तर राज्यात प्रसिद्ध होती. नवले हे मामासाहेब मोहोळ यांचे मानसपुत्र मानले जातात. दोघांनीही तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले.
नवले यांनी शरद पवार यांच्या मदतीने कासार साई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. मुळशी, मावळ, खेड, शिरूर, हवेली या तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नवले यांनी शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी प्रवृत्त केले. त्यामुळे भाताच्या आगारातून उसाचे उत्पादन होऊ लागले. नवले यांचे त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून शरद पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. परंतु पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची निर्मिती केल्यानंतरही नवले यांनी कॉंग्रेसची साथ सोडली नाही.
कॉंग्रेस पक्षामध्ये राहूनच त्यांनी शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मदतीने कारखाना प्रगतिपथावर नेला. अर्थात एकेकाळी केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या कारखान्यात आता शिवसेना, भाजपचाही शिरकाव झाला आहे. या कारखान्यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व निर्माण होऊ लागले आहे. नवले यांचेही वय झाल्याने शारीरिक प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे ते कारखान्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाहीत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. तथापि ॲड. ज्ञानेश नवले यांनी अचानक राष्ट्रवादीत प्रवेश करून मुळशी तालुक्याला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आगामी काळात तालुक्याच्या सहकाराच्या राजकारणात तसेच संत तुकाराम कारखान्याच्या नेतृत्वाच्या कारभारात निश्चित फेरबदल होतील, अशी चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रवेशावेळी आमदार शंकर मांडेकर यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Q1: ज्ञानेश नवले यांनी कोणत्या पक्षात प्रवेश केला?
A1: त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Q2: त्यांचे वडील कोण आणि त्यांचा पक्ष कोणता?
A2: त्यांचे वडील माजी खासदार विदुरा नवले — ते अजूनही कॉंग्रेस पक्षात आहेत.
Q3: त्यांच्या प्रवेशाचा परिणाम काय होऊ शकतो?
A3: मुळशी तालुक्यातील सहकारी राजकारणात व साखर कारखान्याच्या सत्तासंतुलनात बदल होऊ शकतात.
Q4: विदुरा नवले यांचे शरद पवारांशी काय संबंध आहेत?
A4: ते शरद पवार यांचे महाविद्यालयीन काळातील निकटचे मित्र असून त्यांच्यासोबत राजकीय व सहकारी चळवळीत कार्यरत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.