Bhgirath Bhalke-Kalyanrao Kale-Yashwant Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vitthal Parivar : आमदार यशवंत मानेंवर विठ्ठल परिवार नाराज; 'आतापर्यंत गप्प होतो, यापुढे आम्ही गप्प बसणार नाही'

Mohol Assembly Constituency : मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील 17 गावांनी मोहोळ तालुक्याच्या बरोबरीने यशवंत माने यांना मताधिक्य दिले आहे. निधी देताना आमच्या गावात मात्र दुजाभाव करण्यात आलेला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 06 October : आमदार यशवंत माने यांना आम्ही मोहोळ तालुक्याच्या बरोबरीने मताधिक्क्य दिले आहे. मात्र, निधी देताना आमदार माने यांनी दुजाभाव केला आहे, अशा शब्दांत पंढरपूरमधील विठ्ठल परिवाराने आमदार माने यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे निधीबाबतचा दुजाभाव आगामी काळात चालणार नाही, असा इशाराही परिवाराकडून देण्यात आला.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवाराकडून (Vitthal Parivar) राजकीय दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, विठ्ठल कारखान्याचे माजी अध्यक्ष भगीरथ भालके, युवराज पाटील आणि गणेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

भालके यांनी माध्यमांशी बोलताना परिवाराच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी मांडलेल्या भावना सांगितल्या. ते म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीत पंढरपूर तालुक्यातील 17 गावांनी मोहोळ तालुक्याच्या बरोबरीने यशवंत माने (Yashwant Mane) यांना मताधिक्य दिले आहे. निधी देताना आमच्या गावात मात्र दुजाभाव करण्यात आलेला आहे, अशा तक्रारी या गावातून आलेल्या आहेत. आमदार माने यांनी या भागात निधी देताना आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निधी द्यायला पाहिजे होता.

आतापर्यंत आम्ही गप्प होतो. पण यापुढे आम्ही गप्प बसणार नाही, हे आम्ही संबंधित लोकप्रतिनिधींना सांगणार आहोत. आमच्या भागालाही निधीचा समान वाटा दिला पाहिजे. तो निधी कुणाला द्या, हे मी सांगणार नाही. त्या गावातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना निधी देताना विचारत घेतले पाहिजे, असेही भालके यांनी स्पष्ट केले.

आमदार यशवंत माने यांच्याकडून ठराविक लोकांनाच जवळ धरलं जातंय. जो मतदानादिवशी बाहेरगावी असतो, त्याला आमदारांकडून निधी दिला जातो. पण ज्यांनी काम केले आहे, त्या विठ्ठल परिवाराच्या कार्यकर्त्याला मात्र विचारले जात नाही. निधी देताना त्यांनी पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल परिवारातील नेत्यांना त्यांनी कधीही विचारले नाही, असा आरोप कल्याणराव काळे यांनी केला.

पंढरपूर तालुक्यातील 14 गावांत निधी देताना विठ्ठल परिवाराला 50 टक्के निधी दिला पाहिजे. ज्यांना निवडणुकीत निवडून यायचं आहे. त्यांच्याकडून आम्ही सर्व गोष्टी बांधून घेणार आहोत, त्यानंतर आम्ही पाठिंब्याचा निर्णय घेणार आहोत, असेही काळे यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आमदारांनी लक्ष घातलं नाही पाहिजे. आम्ही उभा केलेल्या उमेदवाराला त्यांनी मदत केली पाहिजे. तसेच, निवडणुकीत ताकद आम्ही लावायची.निवडून आम्ही आणायचं आणि निधी देताना दुजाभाव करायचा, हे यापुढे चालणार नाही, असा इशारा काळे यांनीही दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT