Solapur, 05 October : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील राजकीय भूमिका ठरवण्यासाठी पंढरपूरमधील विठ्ठल परिवाराने बैठकांचे आयोजन केले आहे. पंढरपूर तालुका हा सांगोला, माढा, पंढरपूर-मंगळवेढा आणि मोहोळ मतदारसंघात विभागला गेला आहे. त्यामुळे विठ्ठल परिवाराची भूमिका या चार मतदारसंघात सध्याच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. विठ्ठल परिवाराच्या या बैठकांमुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
विठ्ठल परिवाराची (Vitthal Parivar) मोहोळ विधानसभा मतदारसंघाबाबतची बैठक आज शनिवारी (ता. 5 ऑक्टोबर) झाली. सांगोला आणि माढ्याची बैठक ही उद्या (रविवारी ता. 6 ऑक्टोबर), तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाबाबत येत्या सोमवारी (ता. 7 ऑक्टोबर) विचारविनिमय बैठक होणार आहे.
पंढरपूर (Pandharpur) तालुका हा सांगोला, पंढरपूर-मंगळवेढा, माढा आणि मोहोळ या चार मतदारसंघात विभागला गेला आहे, त्यामुळे या चारही मतदारसंघात पंढरपूर तालुक्याची भूमिका निर्णायक ठरते. पंढरपूरच्या राजकारणात विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार आपले वर्चस्व राखून आहेत. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवारात विस्कळीतपणा आलेला आहे.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ताबा आपल्याकडे आल्यानंतर अभिजीत पाटील यांनीही आपण विठ्ठल परिवाराचे प्रमुख असल्याचे सांगून परिवारावर दावा केलेला आहे. मात्र, परिवारातील कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील आणि गणेश पाटील यांचा सवतासुभा आहे. या चौघांनी विठ्ठल परिवाराची भूमिका ठरविण्यासाठी बैठकांचे आयोजन केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माढा, मोहोळ, सांगोला, पंढरपूर मंगळवेढा या चार मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेकांची नावे चर्चेत आली आहेत. मात्र, विठ्ठल परिवाराने विधानसभा निवडणुकीत आपली भूमिका निर्णायक ठरू शकते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्या दृष्टिकोनातूनच बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भूमिका घेतली जाणार आहे. तसेच, त्यानुसार कार्यकर्त्यांना सूचनाही करण्यात येणार आहेत, त्यामुळे या बैठकीकडे या चार मतदारसंघातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्याकडून विठ्ठल परिवाराला उमेदवारीत डावलले आणि विठ्ठल परिवाराने अपक्ष निवडणूक लढवण्याची निर्णय घेतला त्याचे परिणाम चारही मतदारसंघांमध्ये जाणवू शकतात. हे लक्षात घेऊन विठ्ठल परिवाराकडून दबावतंत्राचे राजकारण केले जाऊ शकते.
मोहोळ आणि पंढरपूर मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा आरक्षणाचा परिणाम दिसून आला आहे, त्यामुळे या मतदारसंघात उमेदवार निश्चित करताना मराठा समाजाच्या नेत्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे विठ्ठल परिवार दबावतंत्र वापरून कोणत्या मतदारसंघाची उमेदवारी पदरात पाडून घेतो, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.