Wai Politics News : पालिका निवडणुकीत सत्ता काबीज करण्यासाठी सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष) आणि भाजप या महायुतीतील मित्रपक्षात सुरुवातीला एकतर्फी वाटणारी लढत भाजपने नियोजनपूर्वक प्रचार करून अटीतटीची बनवली. यावेळी मतदारांनी भाजपला साथ देताना मंत्री मकरंद पाटील यांना अजूनही वेळ गेलेली नाही. कार्यकर्त्यांमध्ये एकजिनसीपणा आणण्याचा सूचक इशाराच निकालातून दिला.
राष्ट्रवादीमधील अंतर्गत गटबाजी नगराध्यक्ष उमेदवाराच्या पराभवास कारणीभूत ठरली. पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला 12 सदस्य निवडून आल्याने सभागृहात काठावरचे बहुमत मिळाले. या निवडणुकीत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरेंनी घातलेले लक्ष याचा परिपाक मकरंद पाटील यांचा वेगाने दौडणारा वारू रोखण्यात भाजपला यश आले आहे.
पालिका निवडणुकीचा बिगूल वाजला, त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष अनिल सावंत समर्थकांनी नगराध्यक्ष उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी प्रदर्शित करून प्रचारात आघाडी घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांनी भाजपची वाट धरली, तसेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी विचार विनिमय करून एकमताने त्यांची उमेदवारी जाहीर केली.
त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक अनिल सावंत यांच्या उमेदवारीने चुरशीची झाली. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या अधिक होती. त्यामुळे उमेदवारांची निवड करताना पक्षश्रेष्ठींना मोठी तारेवरची कसरत करावी लागली.
डॉ. नितीन कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यास झालेल्या विलंबाचा फायदा भाजपने उठवला. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारलेल्या काहींनी भाजपची वाट धरून राष्ट्रवादीला नामोहरम केल्याचे दिसून येते. शहरात भाजपची असलेली मूळ ताकद व त्यात झालेले क्रॉस वोटिंग याचा फायदा अनिल सावंत यांच्या विजयास कारणीभूत झाला.
राष्ट्रवादीच्या 12 नगरसेवकांना मिळालेले मताधिक्य डॉ. कदम यांना मिळू शकले नाही. काही प्रभागात राष्ट्रवादीने जुन्या पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्याने त्याबाबत कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीची भिस्त असलेल्या मुस्लिम मतदारांनीही भाजपला मतदान केल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
जिल्ह्यात राज्यात असलेल्या भाजप लाटेचाही फायदा वाईतही मिळाल्याने भाजप नगरसेवकांची संख्या अपेक्षेपेक्षा अधिक ठरली. आता निवडून आलेल्या त्यांच्या नगरसेवकांना ताकद देतानाच त्यांना विकासकामांसाठी निधीच्या माध्यमातून मदत करण्यावर मंत्री मकरंद पाटील यांना भर द्यावा लागणार आहे. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतही मंत्री पाटील यांना मतदारसंघात होणारा भाजपच्या नेत्यांचा हस्तक्षेप त्रासदायक ठरणार आहे.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी लक्ष घातल्याने बॅकफूटवर असलेल्या मदन भोसले यांच्या गटाला संजीवनी मिळाली. त्यांच्या समर्थकांनी व निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे नगराध्यक्ष व पक्षाच्या सर्व उमेदवारांचे काम केल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर डॉ. सुरभी भोसले यांच्या राजकीय पदार्पणातील पहिले यश राष्ट्रवादीसाठी काळजी करायला लावणारे आहे. शहरातील राष्ट्रवादी नेते आपल्या प्रभागातही प्रभावहीन असल्याचे दिसले.
शेवटच्या काही दिवसांत सावंत यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर केलेला फोकस मतदारांनी स्वीकारला, असे म्हणावे लागते. शहरात कोट्यवधींच्या केलेल्या विकासकामांना मतदारांनी नाकारल्याचे स्पष्ट चित्र दिसले. मागील अनुभव जमेस धरून मकरंद पाटील आणि त्यांची टीम काहीशी गाफील राहिली. अनेक प्रभागांत दिग्गजांना विजयासाठी करावा लागलेला संघर्ष, काही प्रभागांत आलेले अपयश भाजपच्या विजयास पूरक ठरले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.