Vijay Wadettiwar, Prithviraj Chavan sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Congress News : पृथ्वीराज चव्हाणांचं काय चुकलं..? विरोधी पक्ष नेतेपदालाही डावलले...

Umesh Bambare-Patil

Satara Congress News : विरोधी पक्ष नेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर होते. पण, नेहमीप्रमाणे श्री. चव्हाण यांचे नाव मागे पडून विजय वडेट्टीवार यांचे नाव काँग्रेसच्या नेतृत्वाने निश्चित केले. विरोधी पक्ष नेतेपदी आपली वर्णी लागण्याची शक्यता असल्याने गेल्या काही दिवसांपासून श्री. चव्हाण यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडण्यास व भूमिका घेण्यास सुरवात केली होती. पण, पक्षश्रेष्टींनी याही वेळी त्यांना डावलले आहे. यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. केवळ राहूल गांधींच्या 'गुड पॉकेट'मध्ये नसल्यानेच त्यांना बाजूला ठेवले जातंय का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

साताऱ्यातील पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे काँग्रेसमधील अनुभवी नेते मानले जातात. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे कामकाज केले आहे. त्यांच्या अनुभवाचा काँग्रेस Congress पक्षाला नेहमीच फायदा झाला आहे. पण, मुख्यमंत्री पदानंतर पृथ्वीराज चव्हाण यांना पुन्हा कोणतीच मोठी जबाबदारी दिली गेली नाही.

संधी आली पण, काँग्रेस पक्षश्रेष्टींकडून त्यांना डावलले गेलं. महाविकास आघाडीचे सरकार सतेत आले, त्यावेळी सुरवातीला आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे पहिल्यांदा विधानसभेच्या सभापती पदासाठी नाव पुढे आले होते. पण, राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाला अंतर्गत विरोध झाला. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्याच वेळी त्यांना मंत्रीपद मिळेल, असेही वाटत होते. मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला पुन्हा खालचे मंत्रीपद देणे कितपत योग्य हा मुद्दा पुढे आला असावा, त्यातून त्यांना मंत्रीपदावर संधी दिली गेली नसावी.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. तसेच नेहरु व गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला असावा अशी भूमिका राहुल गांधी व प्रियांका गांधींनी त्यावेळी व्यक्त केली होती. त्याच दरम्यान, काँग्रेसच्या २३ ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून गेल्या सहा वर्षात पक्षाची सतत पडझड होत असल्याची नोंद घेत पक्षात मोठे बदल करण्याच गरज असल्याचे

पत्रात नमुद केले होते. या पत्रावर पृथ्वीराज चव्हाण यांचीही सही होती. गांधी घराण्याच्या जवळचे असूनही पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ या पत्रावर सही केल्यामुळे त्यांच्याविषयी पक्षश्रेष्टीत नाराजी निर्माण झाली का, हाही प्रश्न आहे. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि थोरातांना राज्य मंत्रीमंडळात स्थान मिळाले. त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी इतर नेत्यांकडे द्यावी, अशी मागणी झाली.

त्यावेळी या पदासाठी पृथ्वीराज चव्हाण, राजीव सातव यांची नावे पुढे होती. तसेच अखेरच्या क्षणी अमित देशमुख यांचेही नाव होते. पण, त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला असल्याने त्यांनाच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली. त्याही वेळी श्री. चव्हाण यांचे नाव मागे पडले. आता शिंदे,फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट फुटून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सत्तेत सहभागी झाला.

त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचाच विरोधी पक्ष नेता होणार हे निश्चित होते. त्यासाठी कोणाचे नाव निश्चित होणार यासाठी पक्षश्रेष्टीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. याहीवेळी पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचा अनुभवी ज्येष्ठ नेता म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला दुजोरा मिळेल, असे वाटत होते. विरोधी पक्ष नेतेपदी आपली वर्णी लागण्याची शक्यता असल्याने गेल्या काही दिवसांपासून श्री. चव्हाण यांनी आक्रमकपणे मुद्दे मांडण्यास व भूमिका घेण्यास सुरवात केली होती.

पावसाळी अधिवेशनात ही त्यांनी अनेक मुद्दे आक्रमकपणे मांडले तसेच शिंदे, फडणवीस सरकारमधील मंत्र्यांना धुधु धुतले होते. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदी त्यांची वर्णी लागण्याची आशा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना होती. पण, आज सर्वांची नावे बाजूला पडून विजय वडेट्टीवार यांचे नाव पक्षश्रेष्टींनी निश्चित केले.

त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारख्या अनुभव संपन्न नेत्याला डावलण्याची परंपरा याही वेळ कायम राहिली आहे. केवळ राहूल गांधींच्या गुड पॉकेटमध्ये नसल्यानेच त्यांना बाजूला ठेवले जातंय का, असा प्रश्न आता उपस्थित होत असून पृथ्वीराजबाबांचे नेमके चुकलं काय, असा प्रश्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT