<div class="paragraphs"><p>Raju Shetti Polling agent</p></div>

Raju Shetti Polling agent

 

sarkarnama 

पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टी हे साखर कारखानदारांचे पोलिंग एजंट होतात तेव्हा...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या (Kolhapur district bank election) निवडणुकीच्या निमित्ताने अनेक राजकीय समीकरणे बदलली. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील मैत्रीला तडे गेले. महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील पॅनेलमध्ये भाजपचे महाडिक जाऊन बसले. शिवसेनेचे दुसरे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री पक्षाच्या पॅनेलच्या विरोधात गेल्या. शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) हे तर ज्यांच्याशी आतापर्यंत लढले त्या साखर कारखानदारांचे पोलिंग एजंट बनल्याचे आज दिसून आले.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेसाठी आज मतदान झाले. त्यावेळचा प्रसंग संघटनेचे माजी पदाधिकारी दिलीप माणगावे यांनी लिहिला आहे. शिरोळ तालुक्यातील दोन साखर कारखानदार राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर व दत्ता साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्यात सोसायटी मतदारसंघातून लढत होत आहे. शिरोळमध्ये राजू शेट्टी यांचा ज्यांच्याशी सातत्याने संघर्ष झाले त्या सा. रे. पाटील यांचे गणपतराव हे पुत्र आहेत.

Raju Shetti

माणगावे लिहितात,``शिरोळमधे मतदान केंद्रावर गेलो होतो. प्रवेशद्वारावर गणपतराव पाटील आणि तालुक्यातील राजकीय नेते दिसले. पण गणपतराव पाटील यांच्यावर निवडणूक लादलेले शेट्टी दिसले नाहीत. ज्या कारखानदाराने (सा. रे. पाटील) आणि त्यांच्या समर्थकांनी शेट्टी यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना सर्वसाधारण सभेत बडवले. पोलिसाकरवी जवळपास २०० कार्यकर्त्यांवर लाठ्या चालवल्या. सा. रे. पाटील यांच्या समर्थकांनी कारखान्याच्या गेटबाहेर असलेल्या मोटारसायकली दगडे टाकून चेचल्या. या मोटारसायकलींच्या नंबरप्लेट वरून पोलिसांनी कार्यकर्ते पकडले आणि अटक केली. हे कार्यकर्ते दहा वर्षे जयसिंगपूर कोर्टात हेलपाटे मारत राहिले. या कटू आठवणी लक्षात ठेवून राजू शेट्टी यांनी उघडपणे सा. रे. पाटील यांचे चिरंजीव व दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या बरोबरीने प्रवेशद्वारावर उभे राहण्याचे टाळले असावे, असा कयास बांधला. तोपर्यंत यड्रावकर गटातील एका प्रमुख कार्यकर्त्यांने मला सांगितले की राजू शेट्टी हे गणपतराव पाटील यांचे मतदान प्रतिनिधी म्हणून आत बाकड्यावर बसले आहेत.

``मला हे पटले नाही. स्वत:ला २१७ शेतकरी संघटनांचे नेते म्हणवणारे, माजी आमदार, दोन वेळा संसदेत खासदार राहिलेले, देशाचे सामर्थ्यवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझ्या विरोधात निवडणूक लढवा म्हणून ललकारणारे, एकेकाळी बारामतीत जावून शरद पवार यांना आव्हान देणारे राजू शेट्टी एका कारखानदाराचे पोलिंग एजंट बनून आत बसले आहेत यावर माझा विश्वास बसला नाही. मी त्या कार्यकर्त्याला म्हटले, शक्यच नाही. तो कार्यकर्ता म्हणाला,`` सोशल मिडिया बघा.`` मी मोबाईल काढून बघितला. धक्काच बसला. छातीवर संघटनेचा लाल बिल्ला आणि गळ्यात साखर कारखानदाराचे ओळखपत्र अडकवलेले राजू शेट्टी दिसले. (दादा निदान आजच्या दिवशी बिल्ला तरी काढून ठेवायचा) अतिशय वाईट वाटले.

``एकेकाळी या शेट्टींना शरद जोशी यांनी बळ दिले. अर्धपोटी राहून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून शेट्टी यांचे कारखानदारांच्या विरोधात नेतृत्व उभे केले. रघुनाथ दादा पाटील, सदाभाऊ खोत, लक्ष्मण वडले, अमर हबीब, पाशा पटेल, उल्हास पाटील, शोभाताई वाघमारे, अजित नरदे, भगवान काटे, शिवाजी माने, संजय कोले या कार्यकर्त्यांनी आपला घसा कोरडा होईपर्यंत भाषणे केली. शिरोळ आणि हातकणंगले मतदारसंघातील स्वाभिमानी जनतेने विधानसभेत आणि लोकसभेत शेट्टींना ताठ मानेने पाठवले. कारखानदारांने मला मारले, असे म्हणत निवडणुकीत आपल्या रक्तबंबाळ झालेला चेेहऱ्याचे पोस्टर दाखवत, जनतेला भावना प्रधान करीत शेट्टींनी मते मागितली. त्याचं कारखानदाराचे पोलिंग एजंट म्हणून शेट्टी एका बाकड्यावर बसले होते,`` असे वर्णन माणगावे यांनी केले आहे.

राजकारण हा शेट्टी यांचा धंदा झाला आहे. हा धंदा चालवण्यासाठी शेट्टी कोणत्याही थराला जाऊ शकतात हे आम्ही हातकणंगले मतदारसंघातील जनतेने बघितले आहे. रघुनाथ दादा पाटील असोत वा सदाभाऊ खोत असोत. त्यांच्या विरोधात बदनामीचे षडयंत्र रचून त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. ज्या सदाभाऊ यांना जयंत पाटील यांच्या समर्थकांनी बडवले त्यांच्याशी हातमिळवणी केली. कारखानदारांच्या आणि त्यांच्या पाठिंब्यावर चाललेल्या सरकारच्या मदतीने शेट्टींनी एकेक कार्यकर्ते संपवले. शेट्टींना पश्चिम महाराष्ट्रात फक्त आपलीच संघटना चालवायची आणि टिकवायची आहे. इतर संघटना आणि त्यांचे कार्यकर्ते कसे खच्ची करता येईल इकडे शेट्टी यांचे बारीक लक्ष असते. यासाठी शेट्टी कोणत्याही थराला जाऊ शकतात. आपल्याच कार्यकर्त्यांच्या पाठीत रट्टे देणार्या कारखानदाराचा मतदान प्रतिनिधी होणे हा लाचारीचा कळस आहे, अशी कठोर टीका माणगावे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT