Mumbai, 06 July : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ च्या खंडाळा एक्झिटजवळ आज (ता. 06 जुलै) पहाटे मोठी दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, दरडीचे मोठमोठे दगड, राडारोडा रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, ‘मिसिंग लिंक’वर कोसळलेली दरड हटविण्याचे काम कधी होणार आणि वाहतूक कधी सुरू होणार, याबाबतची महत्वपूर्ण अपडेट सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. ते स्वतः दरड हटविण्याच्या कामाच्या ठिकाणी थांबून काम करून घेत आहेत. तेथील पाहणी केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मंत्री भोसले म्हणाले, सोमवारी (ता. ०६ जुलै) पहाटे साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. कंट्रोल सेंटरच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वाहतूक बंद केली. वेळेत निर्णय केल्यामुळे जीवितहानी टाळता आली.
पाणी आणि दगड मोठ्या प्रमाणात आल्यामुळे टनेलचा बीम (पिलर) आहे, तो खाली आला आहे. बाकी टनेलच्या स्ट्रक्चरला कुठेही धोका नाही. तरीही आयआयटीकडून त्याची तपासणी करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून पुढच्या कार्यवाहीबाबत सल्ला घेण्यात येईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, मोठ्या प्रमाणातील पाऊस आणि दगडामुळे टनेलचा पिलर कोसळला आहे. त्यात कोठेही टेक्निकल प्रॉब्लेम आलेला नाही किंवा मटेरियल दुय्यम प्रतीचं वापरलं आहे, असं काही नाही. काही ठिकाणी रस्त्याचा वरचा लिअर उखडला आहे, तो आपण पाऊस कमी झाल्यानंतर तातडीने दुरुस्त करून घेणार आहोत.
पुणे-मुंबई मिसिंग लिंकवर कोसळलेली दरड हटविण्याचे काम येत्या दोन ते तीन तासांत पूर्ण केलं जाईल. येथील चिखलही फायर फायटर टॅंकरच्या साहाय्याने स्वच्छ करण्यात येईल. हे काम झाल्यानंतर या द्रूतगती मार्गावरील किती लेन सुरू करायच्या, याचा निर्णय पाेलिसांच्या सूचनेनुसार घेण्यात येईल. कारण अजूनही घाटावरून पाणी येत आहे, त्यामुळे लेन किती सुरू करायचा, याचा निर्णय पोलिस घेतील, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले.
बांधकाम मंत्री म्हणून मी आदेश देण्यापेक्षा यंत्रणेला निर्णय घेण्याची मुभा दिली पाहिजे. कारण पोलिस, ट्रॅफिक विभागाला या ठिकाणी काय होऊ शकतं, याचा अंदाज आहे, त्यामुळे त्यांना निर्णयाची मोकळीक दिली जाणार आहे. कमीत कमी दोन लेन या ठिकाणच्या सुरू होतील. पुढेही काही प्राब्लेम नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोसळलेली दरड तीन तासांत हटवून स्वच्छतेचे काम पूर्ण होईल. त्यानंतर येथील परिस्थिती बघून कमीत कमी दोन लेन सुरू करण्याचा निर्णय पोलिस यंत्रणा घेईल, असे शिवेंद्रराजेंनी सांगितले
जुन्या महामार्गावरील वाहतूक सुरळीत
खालापूर येथे नदीचे पाणी महामार्गवर आल्याने पुणे-मुंबई जुना महामार्ग काही वेळ बंद झाला आहे. सध्या तो रस्ता सुरू आहे. बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आणि पोलिस विभागाची आपत्कालीन यंत्रणाही आपण जुन्या महामार्गावर ठेवलेली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.