Gokul Dudh Sangh Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Gokul Dudh Sangh : गोकुळ दूध संघात 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्याला अभय कोणाचे?

Rahul Gadkar

Kolhapur, 05 July : काबाडकष्ट करून शेतकरी गोकुळ दूध संघाला दूध पुरवतो. शेतकऱ्यांचा संघ म्हणून ओळख असलेल्या गोकुळ दूध संघाची राज्यात बदनामी नको; म्हणून ह्या ना त्या कारणांनी अनेक प्रकरणं दडपून ठेवली जात आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांच्या प्रकरणांची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. शिवाय विरोधकही तोंडावर बोट ठेवून आहेत.

गोकुळमधील (Gokul Dudh Sangh) दुधाची चोरी, वाहतुकीचे अंतर वाढवून केलेला 35 लाखांचा (35 Lakh) घोटाळा चर्चेत असताना पुन्हा एकदा पशुसंवर्धन विभागातील मनमानी कारभाराची चर्चा निनावी पत्रामुळे जोर धरू लागली आहे. इतकेच नव्हे तर 330 लिटरची दूध चोरी करणाऱ्या चोरट्यांकडून दहापट दंड वसूल करून प्रकरण संघापुरतच मर्यादित ठेवण्यात आलं. पण, 35 लाखांचा घोटाळा (35 Lakh Scam) करणाऱ्याकडून 35 लाख वसूलही केले. पण, त्याची पोलिसांत (Police) साधी तक्रारही दिली नाही. त्यामुळे लाखाचा घोटाळा करणाऱ्या संशयिताला अभय का? असा सवाल दूध उत्पादक सभासदांनी केला आहे.

जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक नाडी असणाऱ्या गोकुळ दूध संघाचा कारभार नेहमीच चर्चेत असतो. सत्ताधाऱ्यांची मनमानी आणि विरोधकांचं तोंडावर बोट ठेवणं, संघाच्या तोट्याचं होत चालले आहे. काही महिन्यांपूर्वी गोकुळ दूध संघातील 330 लिटर दुधाची चोरी झाल्याचे उघड झाले होते. संशयिताकडून 25000 रकमेच्या 10 पट इतका दंड रोख स्वरूपात रक्कम जमा करून प्रकरण मिटवण्यात आलं आहे.

पशुखाद्य पुरवठ्यात वाहतुकीचे अंतर वाढवून जवळपास 35 लाखांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले हेाते. मात्र, हे प्रकरण कार्यालयाच्या चार भिंतीच्या आतच मिटवण्यात आलं. संबंधित ठेकेदाराकडून 35 लाख वसूल करण्यात आले.

दूध संघाची आर्थिक फसवणूक म्हणून गुन्हा नोंद करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी संघाची बदनामी नको; म्हणून या दोघाही संशयितांना पाठीशी घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे 35 लाखांचा घोटाळा करणाऱ्या ठेकेदाराला कुणाचं अभय आहे? असा सवाल दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात होत आहे.

सध्या या घोटाळ्याची चौकशी सुरू असून त्यातील संबंधित पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे, असे ‘गोकुळ’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. मात्र, वारंवार होणाऱ्या या प्रकारावर आळा घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून ठोस निर्णय आणि कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.

तेच नव्हे, तर विरोधकांनीसुद्धा तोंडावर बोट ठेवून शांतपणे बघ्याची भूमिका सध्या तरी ‘गोकुळ’मध्ये घेतल्याचे दिसून येते. संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होत असताना सत्ताधाऱ्यांकडून त्याचे उत्तर दिली जात नसल्याची ही चर्चा आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT