Mangesh Chivate  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti Dispute : ‘पुणे शिक्षक’मध्ये शिवसेनेने सामंतांच्या ओएसडीला का उतरवले? शिंदेंच्या निकटवर्तीयाचे अमरावतीकडे बोट दाखवत मोठा गौप्यस्फोट..

Pune Teachers’ constituency : पुणे शिक्षक मतदारसंघातून मंगेश चिवटे यांनी माघार घेतली, मात्र सचिन सानप यांची उमेदवारी कायम आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघातील बंडखोरीचा दाखला देत चिवटे यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यामागील भूमिका स्पष्ट केली आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 17 October : पुणे शिक्षक मतदारसंघातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांनी माघार घेतली असली तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ओएसडी राहिलेले सचिन सानप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता सानप यांच्या पाठीशी शिवसेना ताकदीने उभी राहिल्याचे दिसून येत आहे. पुणे पदवीधरमधून शिवसेनेने उमेदवार कायम ठेवणे आणि त्याच्या पाठीशी संपूर्ण यंत्रणा उभी करण्याचे कारण मंगेश चिवटे यांनी सांगितले. अमरावती शिक्षक मतदारसंघातील ‘भाजप खासदाराची बहीण आणि महसूल मंत्र्यांच्या निकटवर्तीयांच्या’ बंडखोरीकडे बोट दाखवत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणारे सचिन सानप आणि माघार घेणारे मंगेश चिवटे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. या वेळी मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या बंडखोरीचे समर्थन केले.

ते म्हणाले, अमरावती शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपच्या दोन तीन तगड्या नेत्यांनी बंडखोरी केली आहे. राज्यसभा खासदाराच्या बहिणीने बंडखोरी केली आहे. तसेच, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निकटवर्तीय असल्याचा दावा एक उमेदवार करत आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर अमरावतीमधील बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरतील, असे वाटत होते. मात्र, तसं काही घडलेले दिसत नाही, असा संदर्भ चिवटे यांनी पुण्यातील बंडखोरीबाबत दिला आहे.

ते म्हणाले, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांचा शब्द अंतिम असतो. त्यानुसार सानप यांच्या विजयासाठी आम्ही शिवसैनिक मैदानात उतरलो आहोत. संपूर्ण जिल्ह्यात आम्ही फिरत आहोत. त्यामुळे सानप हे विक्रमी मतांनी विजयी होतील. त्यात सर्वाधिक मतदान सोलापूर जिल्ह्यातून मिळालेले असेल.

एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांनी नाराजीतून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याशी आमची एक तास चर्चा झाली. सानप यांनीही त्यांची मनधरणी केली असून उद्योग मंत्री सामंत यांनीही आडसूळ व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. आज संध्याकाळपर्यंत त्यांची नाराजी दूर होऊन ते सानप यांच्या पाठीशी उभे राहतील. मी सुद्धा पाच जिल्ह्यांत फिरत राहणार आहे, असेही चिवटे यांनी स्पष्ट केले.

पुणे पदवीधर मतदारसंघातील राणी सुजित खुर्द ह्या मला भेटायला आल्या होत्या, त्यामुळे त्यांना शुभेच्छा दिल्या. पक्षाने त्यांना अजून अधिकृत पाठिंबा दिलेला नाही. शिवसेनेला वारंवार डावललं जातंय का, त्यातून पुणे शिक्षक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे का, याचे उत्तर पक्षाचे वरिष्ठ नेते देतील, असेही चिवटे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT