Solapur, 08 November : भारतीय जनता पक्षाचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यावर त्यांचे राजकीय विरोधक तथा शिवसेनेचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर कल्याणशेट्टींना का जायचे आहे, याबाबतचा मोठा गौप्यस्फोट म्हेत्रे यांनी केला आहे. त्यावरून अक्कलकोटमध्ये पुन्हा राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.
अक्कलकोट तालुक्यातील एका कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांंनी नरेंद्र मोदींपासून कल्याणशेट्टींपर्यंत सर्वांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, पण किती गुर्मी? कुठं होतास तू? काय होतं तुझं? काय होतास तू...काय झालास तू? असा कसा वाया गेलास तू.. (तेवढ्यात गर्दीतून कोणीतरी रक्कम...रक्कम असे ओरडले) हॉ रक्कम...रक्कम..माल गोळा केला आहे.
डीसीसी बॅंकेवर जाण्यासाठी हे असं काय करू लागले आहेत, असा प्रश्न पडलेला असताना त्यांचेच लोक सांगतात. ह्यांनी जे दीड ते दोन हजार कोटी रुपये कमविले आहेत, ते दोन नंबरचे पैसे एक नंबर करायचे असल्यामुळे त्यांना डीसीसी बॅंकेवर जायचं आहे, असा गौप्यस्फोट म्हेत्रे यांनी केला आहे.
उजनी धरण परिसरातील नियोजित एआय डेटा सेंटर, अणुभट्टी आणि इतर प्रकल्पाबाबत माजी मंत्री म्हेत्रे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले उजनी धरणातील 40 टक्के पाणी बाष्पीभवन होते. एआय डेटा सेंटर आल्यावर पाणी आणखी वाया जाणार आहे. मात्र इथले नेते (सचिन कल्याणशेट्टी) म्हणतात डेटा सेंटर होणारच. 100 पवार येउदे ते डेटा सेंटर होणारच, असं इथले नेते म्हणतात, असा टोलाही आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना म्हेत्रे यांनी लगावला.
गुजरातने नको म्हटलेला Ai डेटा सेंटर प्रकल्प इकडे आणला आहे. त्यातून आलेले 15-20 टक्के कमिशन खाऊन तेच पैसे इलेक्शनमध्ये वाटतात. आणि तुम्हीही पैसे घेऊन त्यांना मतदान करता. तुम्ही त्यांना मतदान करता आणि पाणी नाही म्हणून आमच्याकडे बोंबाबोंब करता. संविधान वाचवा म्हणून हेच सत्ताधारी मोर्चा काढतात. मात्र, त्यांना संविधान काय माहिती आहे. कल्याणशेट्टी यांचे सर्व निवडून आलेले अक्कलकोट तालुक्यातील उमेदवार हे डुप्लिकेट सर्टिफिकेटवर निवडून आलेले आहेत. त्यांच्याविरोधात केसेस सुरु आहेत, असाही दावा म्हेत्रे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.