Sharad Pawar-Anil Sawant Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Anil Sawant : सावंतांच्या पुतण्याला का हवीय राष्ट्रवादीची उमेदवारी? अनिल सावंतांनी दिले 'हे' उत्तर...

Vijaykumar Dudhale

Solapur, 08 September : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे तथा भैरवनाथ शुगर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे. अनिल सावंत यांचे काका शिवसेना नेते, राज्यात मंत्री असूनही त्यांना राष्ट्रवादीकडून का निवडणूक लढवावी वाटते, याची चर्चा सुरू आहे. त्याबाबत खुद्द अनिल सावंत यांनीच खुलासा केला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून (Pandharpur-Mangalvedha Constituency) उमेदवारी मिळावी, यासाठी शिवसेनेकडेही आम्ही मागणी केली आहे. पण, पोटनिवडणुकीत भाजपचा आमदार निवडून आल्यामुळे ही जागा भाजपकडे जाईल, असे सर्वांप्रमाणेच मलाही वाटते. त्यामुळे आम्ही उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहोत. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे, असे अनिल सावंत (Anil Sawant) यांनी स्पष्ट केले.

मी सध्या मतदारसंघात फिरत आहे, त्या वेळी मी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी विचारणा करत आहे. त्या वेळी जनताच सांगते की, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तर सोपं जाईल. त्यानुसार आम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगून राष्ट्रवादीची उमेदवारी का मिळावी, याचे उत्तरच सावंतांनी देऊन टाकले आहे.

सावंत म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मागण्यापूर्वी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी माझी कुठलीही चर्चा झालेले नाही. आमच्या काकांचा मतदारसंघ वेगळा, त्यांचा जिल्हा वेगळा आहे. त्यांचं कामही आहे. पंढरपुरातही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आरोग्याचे काम करत आहेत.

भैरवनाथ शुगर हा साखर कारखाना मंगळवेढा तालुक्यात आहे. त्या माध्यमातून मीही या मतदारसंघात काम करत आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार मागितली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसंदर्भात आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशी आम्ही अजूनही चर्चा केलेली नाही. वेळ आल्यानंतर मी काकांशी या विषयावरही चर्चा करणार आहे, असेही अनिल सावंत यांनी स्पष्ट केले.

अनिल सावंत म्हणाले, सध्या माझा गाव भेट दौरा सुरू आहे. आतापर्यंत पंढरपूर मतदारसंघातील सुमारे ४० गावांत माझा दौरा झालेला आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून या भागात कायम संपर्क असतो. भूम-परांडा मतदारसंघात ज्या प्रमाणे तानाजी सावंत यांनी काम केले आहे, त्या प्रमाणे मलाही पंढरपूर मंगळवेढ्यात काम करायचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT