VIkram Shinde-Babarao Shinde Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : माढ्याच्या शिंदेंना करमाळ्याच्या ‘आदिनाथ’मध्ये एवढा इंटरेस्ट का?

कारखानदारीचा अनुभव मोठा असल्याने आम्ही आदिनाथ चांगला चालवू, असा दावा शिंदे यांचा आहे. त्यामुळे आदिनाथची निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित आहे.

​अण्णा काळे

करमाळा : करमाळ्याच्या (Karmala) राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची (Adinath Sugar Factory) निवडणूक लवकर होत आहे. आदिनाथवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच नेते इच्छुक आहेत. त्यात माढ्याच्या शिंदे बंधूंनाही आदिनाथ हवा आहे. माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Baban shinde) आणि करमाळ्याचे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे (Sanjay Shinde) या बंधूंच्या ताब्यात खासगी कारखाने आहेत, त्यानंतरही आदिनाथ कारखान्यामध्ये त्यांचा असलेला ‘इंटरेस्ट’ काही लपून राहिलेला नाही. यावरून आदिनाथचे राजकीय महत्त्व आधोरेखित होते. (Why is Shinde from Madha so interested in Karmala's Adinath Sugar factory?)

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला तीन वर्षांपूर्वी आदिनाथ भाडेतत्त्वावर देण्याचा विषय चर्चेचा ठरला होता. हा करार कसा झाला, त्यानंतर न्यायालयीन लढाई कशी झाली? आणि करार रद्द होताना आरोग्य मंत्री तानाजी सावंतांनी लावलेली ताकद सर्वपरिचित आहे. करमाळा तालुक्यातील राजकारण पाहता आदिनाथ कारखाना ताब्यात आला आणि चांगला चालवला, तर करमाळ्यातील आपली आमदारकी अबाधित राहण्यास मदत होईल. भविष्यात माढा मतदारसंघातही काही अडथळा येणार नाही, हे उघड आहे.

बागल गटाची सत्ता असलेला आदिनाथ कारखाना बारामती ॲग्रोला २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला. हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी सुरुवातीच्या काळात बागल गटाचा पुढाकार होता. मात्र, याच निर्णयाविरोधात नंतर सत्ताधारी बागल कोर्टात गेले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी आमदार नारायण पाटील यांनी देखील आपली ताकद वापरून भाडेतत्त्वावर करार झालेला रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न केले. आदिनाथ पवारांच्या ताब्यात गेला नाही पाहिजे, याला शिंदेंचा छुपा पाठिंबा होता, हे आता लपून राहिलेले नाही.

आदिनाथ कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाल्यानंतर त्या विरोधात बागल कोर्टात लढत असताना आदिनाथच्या अकाउंटवर बॅलन्स नव्हता. त्यावेळी एका मोठ्या नेत्याशी संबंधित कारखान्याच्या अकाउंटवरून ‘आदिनाथ’च्या अकाउंटवर १० लाख रुपये जमा झाले होते. त्याचा वापर पुढे आदिनाथचे अध्यक्ष धनंजय डोंगरे यांनी मुंबई, पुणे या ठिकाणी न्यायालयीन लढाईसाठी वापरल्याचे सांगितले जाते.

रोहित पवार यांना आदिनाथ कारखाना सुरू करण्यास विलंब होऊ लागल्याने विठ्ठल रिफाइंड शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे यांनी ‘आदिनाथ माझ्या ताब्यात द्या, मी एक महिन्यात सुरू करून दाखवतो,’ असे जाहीर विधान केले होते. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांनी अद्याप आदिनाथविषयी कोणतीही वाच्यता केलेली नाही. त्यांच्या भूमिकेबाबत करमाळ्याच्या जनतेला उत्सुकता आहे.

शिंदे बंधूंनी आदिनाथ कारखान्याची निवडणूक लढवावी आणि आदिनाथ ताब्यात घ्यावा, अशी मागणी शिंदे समर्थकांनी चिखलठाण येथील कार्यक्रमात केली होती. कार्यकर्त्यांची भूमिका लक्षात घेऊन भविष्यात आदिनाथ लढवू, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले होते. आदिनाथ कारखाना करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या ताब्यात द्या, आम्ही तो चांगला चालवून दाखवू, असे बबनराव शिंदे यांनी नुकतेच म्हटले आहे. एकूणच ‘आदिनाथ’विषयी शिंदे यांचा इंटरेस्ट व्यावसायिक दृष्टिकोनाबरोबरच राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारखानदारीचा अनुभव मोठा असल्याने आम्ही आदिनाथ चांगला चालवू, असा दावा शिंदे यांचा आहे. त्यामुळे आदिनाथची निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित आहे.

सत्ताधारी बागल गटासमोर आदिनाथ  आणि मकाई या दोन्हीही कारखान्यांना अडचणीतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान आहे. तीन टर्म बागल गटाच्या ताब्यात असलेल्या आदिनाथची अवस्था बिकट आहे. कारखान्यासंदर्भात बागल गट काय भूमिका घेणार, याविषयी उलट सुलट चर्चा आहे.

‘माझे वडील (कै.) गोविंदबापू पाटील यांचा आदिनाथसाठी मोठा त्याग आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभे करून सत्ता आणून कारखाना चांगला चालवून दाखवण्याचा दावा माजी आमदार नारायण पाटील यांनी केला आहे.

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आदिनाथविषयी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, जगताप हे आदिनाथ कारखाना चालवण्यासाठी इच्छुक आहेत, असे कार्यकर्ते सांगतात.

सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर मिळू शकला नाही, अशी खंत आमदार रोहित पवार यांना आहे. तेही संधी मिळेल, तेव्हा आदिनाथबाबत बोलत असतात. बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची तालुक्यातील ऊस उत्पादकांशी असलेली नाळ बघता पवार यांचीही भूमिका महत्वाची राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT