Devendra Fadnavis Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Devendra Fadnavis : फडणवीसांचा घोषणांचा पाऊस; सोलापूर वाढवण बंदराशी जोडणार, दररोज पाणी अन्‌ यंत्रमागधारकांसाठी ‘इचलकरंजी पॅटर्न’

Solapur Corporation Election Sabah : नाशिक-सोलापूर-अक्कलकोट महामार्गामुळे सोलापूर वाढवण बंदर व मुंबई-दिल्ली महामार्गाशी जोडला जाणार असून दररोज पाणीपुरवठा आणि यंत्रमागधारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबविण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Vijaykumar Dudhale

Solapur, 10 January : सोलापूर जिल्ह्यासाठी नाशिक-सोलापूर-अक्कलकोट हा महामार्ग नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. काही लोकांना वाटत असेल हा मधलाच कुठला तरी रस्ता आहे. पण, तो देशातील सर्वांत मोठं आणि जगातील दहाव्या क्रमांकाचं असलेल्या वाढवण बंदराशी जोडणारा आहे. या रस्ताच्या माध्यमातून सोलापूर हे वाढवण बंदर आणि मुंबई-दिल्ली महामार्गाशी जोडले जाणार आहे, अशी घोषणा करण्याबररोबरच शहराला दररोज पाणीपुरवठा आणि यंत्रमागधारकांसाठी इचलकरंजी पॅटर्न राबविणार असल्याचेही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सोलापूर महापालिका निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची सभा हरिभाई देवकरण मैदानावर झाली. त्या सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा आश्वासनांचा पाऊस पाडला. तसेच भाजपला महापालिकेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाच वर्षे सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

ते म्हणाले, सभेला येण्यापूर्वी सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी पुढची पाच वर्षे महापालिकेच्या माध्यमातून सोलापूरकरांची (Solapur) सेवा करण्याची संधी भाजपला द्या, अशा आशीर्वाद मागण्यासाठी गेलो होतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आलो आहे. सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर कुणालाही मागे वळून पाहावे लागत नाही.

डाळिंबाची राजधानी म्हणून सोलापूरची ओळख अलीकडच्या काळात आपल्याला मिळाली आहे. सोलापूरची चादर, शेंगा चटणी, हुरडा ही सगळी ओळख या शहराने मिळवली आहे, आता आधुनिक शहराची ओळख मिळवून द्यायची आहे. सोलापूचं एअरपोर्ट आम्ही सुरू केलं. काही लोकं म्हणायचं विमानसेवा सुरू होणारच नाही. पण आम्ही ते सुरू करून दाखवलं आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

ते म्हणाले, आगामी काळात सोलापुरातून नाईट लॅंडिंग सुरू करण्याचा आमचा मानस आहे. विमानतळ हे पूर्वी श्रीमंतीच निशाणी होतं. विमानसेवा असणाऱ्या शहरात उद्योग येतात. कुणाला तरी हैदराबाद, दिल्लीला जाण्यासाठी ही विमानसेवा नाही, तर शहराला पुन्हा भरभराट येण्यासाठी हे एअरपोर्टंचं काम केलं. मोदी सरकारने सोलापूरसाठी ‘वंदे भारत’ रेल्वेही सुरू केली. औद्योगिकरणासाठी नवी इको सिस्टिम आपण करणार आहोत.

पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर हे पर्यटनाचं सर्कीट आपण केलं आहे. पर्यटनाचे इंजिन म्हणून सोलापूरला विकसित करणार आहोत. शहरातील गरिबांना घर मिळालं पाहिजे, म्हणून आवास योजना सुरू झाली. सोलापूर पंतप्रधान आवास योजना हे सर्वांत मोठं उदाहरण आहे. झोपडपट्टीतील लोकांना आपण घरं देत आहोत. घराकरीता अतिक्रमणधारकांना जमिनीचा मालकी हक्क देणार आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले, उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईनचे काम पूर्ण केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात शहरात पाणीपुरवठ्यासाठी साडेआठशे कोटी रुपये दिले आहेत. त्याचे टेंडरही काढलं. सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज पिण्याचे स्वच्छ पाणी आणल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. सोलापूरची २०५७ ची जी लोकसंख्या असेल, त्या लोकसंख्येला पुरेल एवढे पाणी आपण आताच आणणार आहोत. सोलापूर शहरसाठी शंभर बसेस दिल्या आहेत, त्याच्या चार्जिंग स्टेशनचे काम महिनाभरात केले जाणार आहे.

सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची इथली तरुणांची मागणी होती. त्यासाठी जाागा निश्चित झाली असून आधुनिक आयटी पार्क तयार करून सोलापूरच्या तरुणांना काम मिळवून देणार आहोत. यंत्रमाग उद्योगाला सवलती देऊन त्याला उभारी देण्यासाठी सोलापुरात इचलकरंजी पॅटर्न राबविल्याशिवाय राहणार नाही. आम्ही आश्वासन देणारे नाही, तर काम करणारे आहोत, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

तुम्ही कमळाची काळजी घ्या; पुढची पाच वर्षे हा देवाभाऊ तुमची काळजी घेईल

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. देशमुख मालक, सुभाषबापू इथल्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करा. माझ्या किती लाडक्या बहिणींना लखपती केलं, त्याचा हिशेब द्या आणि मगच काही मागायचे ते मागा. व्यक्ती न पाहता कमळाचं बटण दाबा. पंधरा तारखेला कमळाची काळजी घ्या आणि सोळा तारखेपासून पुढची पाच वर्षे तुमची काळजी हा देवाभाऊ घेईल, असा शब्दही फडणवीस यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT