Devendra Fadanvis, Shivendraraje Bhosale
Devendra Fadanvis, Shivendraraje Bhosale sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीने डावलले : पण, देवेंद्र फडणवीस शिवेंद्रसिंहराजेंना मान देणार?

Umesh Bambare-Patil

सातारा : कै. आमदार अभयसिंहराजे भोसले यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीने मागील तीन पंचवार्षिक मंत्रिपदापासून वंचित ठेवले. आता राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत येत आहे. यानिमित्ताने विधानसभा निवडणुकीत श्री. फडणवीस यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिलेला शब्द पळला जाऊन त्यांना मंत्रिपद व पालकमंत्री पद दिले जाणार का, याकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे.

सातारा तालुक्यासह जिल्ह्याचे भाग्यविधाते माजी मंत्री कै. अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसच्या काळात महत्वाच्या मंत्रीपदावर होते. मात्र, त्यांना राष्ट्रवादीने मंत्रीपदापासून दूर ठेवले होते. त्यांच्या निधनानंतर ही त्यांचे सुपूत्र शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाही तीन पंचवार्षिक राष्ट्रवादीने मंत्रीपद दिले नाही.

विधानसभा निवडणुकीत कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्री पद देतो, या देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दापोटी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या निवडणूकीत ते सातारा जावळीचे आमदार झाले. पण, राज्यात महायुती ऐवजी महाविकास आघाडी सत्तेत आली त्यामुळे मंत्रिपदाचा विषय बाजूला पडला.

आता एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता भाजप आणि एकनाथ शिंदे गट सत्ता स्थापन करत आहे, त्यामुळे या नव्या सरकारमध्ये साताऱ्यातील छत्रपतींच्या घराण्याचे वारसदार म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना पहिल्या टप्प्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. आजपर्यंत राष्ट्रवादीने डावलल्यामुळे भाजपमध्ये जाऊन आमदार झालेल्या शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा शब्द देवेंद्र फडणवीस पाळणार का याची उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT