kolhapur, 07 February : विधानसभा निवडणुकीत कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीत घाटगे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून मुश्रीफांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र विधानसभेतील पराभवानंतर समरजित घाटगे पुन्हा स्वग्रही परतणार असल्याची चर्चा आता भाजपमध्ये जोरात सुरू आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही घाटगे यांच्या पक्षप्रवेशाला हिरवा कंदील मिळाल्याने त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काही दिवसांत घाटगे हे हाती कमळ घेणार असल्याची माहिती आहे. मात्र, भाजपला घाटगे यांची आवश्यकता का आहे? याचे उत्तर विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरच अवलंबून आहे.
भाजपच्या 2014 नंतर आलेल्या लाटेत युती सरकारने कोल्हापूर जिल्ह्यात मजल मारली होती. भाजपने पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने अनेकांचा पक्षप्रवेश करून घेतला. त्यांना विविध महामंडळावर जागा देत पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. यामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांचा देखील समावेश होता. सुरुवातीला पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद, त्यानंतरच्या काळात भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत युतीमुळे घाटगे यांना अपक्ष लढावे लागले. अपक्ष असूनही घाटगे यांना त्यावेळी ८८ हजार ३०८ इतकी मते पडली. त्यानंतर देखील ते भाजपमध्ये सक्रिय राहिले.
विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीत उमेदवारीचा पेच महायुतीमध्ये निर्माण झाल्यानंतर भाजपसोबत फारकत घेत त्यांनी महायुतीचे उमेदवार मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात महविकास आघाडीतून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी घाटगे यांना १ लाख ३३ हजार इतके मते मिळाली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील विरोधातील सर्वात जास्त मते घेणारे ते एकमेव उमेदवार आहेत. मागील निवडणुकीपेक्षा मंत्री मुश्रीफ हे केवळ 11000 च्या आसपास मतांनी विजयी झाले आहेत. वास्तविक पाहता महायुती म्हणून माजी खासदार संजय मंडलिक, मतदारसंघातील भाजप आणि माजी आमदार संजय घाटगे, लाडकी बहिण यांची मदत मिळाली असतानाही मुश्रीफ यांना कमी मताधिक्य मिळाले. मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदा समरजित घाटगे यांना 45 हजार इतकी अधिकची मते मिळाली आहेत.
सध्या भाजपने कोल्हापुरात पक्षाच्या संघटनवाढीवर भर दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील एका बूथनुसार 200 भाजप सदस्य नोंदणी करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. अशातच कागल विधानसभा मतदारसंघातून घाटगे यांना पुन्हा भाजपमध्ये घेतल्यास त्याचा फायदा होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती राहील अथवा ना राहील त्यामुळे भाजपचा गट या ठिकाणी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच समरजित घाटगे यांची विधानसभा निवडणुकीतील मिळालेली मते पाहता भाजपला याचा नक्की फायदा होणार आहे.
घाटगे यांचं सहकारात मोठे नाव आहे. शाहू कारखान्या सोबत शाहू दूध, शिक्षण संस्था, बँकिंग क्षेत्रात देखील योगदान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात राहून सहकारी संस्था सांभाळणे अत्यंत कठीण बनते. यावेळी साधारण सोबत पूरक भूमिका घेऊन राहिल्यास अधिक हिताचे असते, असेही सांगितले जाते. त्यामुळे तेही भाजप प्रवेशावर पूरक भूमिका घेतील, अशी चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून माजी आमदार संजय घाटगे हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांचा पक्षप्रवेश का थांबला हा देखील संशोधनाचा विषय आहे. कागलमधील महायुतीमधील नेत्यांनीच भाजपमध्ये जाण्याचा सल्ला दिला होता, अशीही चर्चा होते. समरजीत घाटगे यांचा भाजप प्रवेश रोखण्यासाठी ही एक चाल असल्याचे बोलले जात आहे. मात्र समरजीत घाटगे यांनी भाजप प्रवेशाला सहमती दिल्यानंतर माजी आमदार संजय घाटगे यांचा पक्षप्रवेश रोखला गेला असल्याची चर्चा आहे.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.